हडपसरमध्ये रचला राजकीय इतिहास; महायुतीचे चेतन तुपे यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

हडपसर – हडपसर विधानसभा मतदारसंघात एकदा झालेला आमदार पुन्हा ते ही सलग दुसऱ्यांदा आमदार होत नाही, असा राजकीय इतिहास होता. यावेळी तो मोडीत काढत सलग दुसऱ्यांदा निवडून येत आमदार चेतन तुपे यांनी नविन राजकीय इतिहास रचला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक फेरीअंती उत्कंठा वाढत होती. अखेर ७ हजार १२२ मताधिक्याने चेतन तुपे विजयी झाल्याने कार्यकर्त्यांनी फटाके फोडत तसेच गुलाल उधळून, पेढे वाटप करीत विजयोत्सव साजरा केला.
पुण्यातील सर्वात मोठा मतदार संघ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात चुरशीची लढत झाली.
महायुतीकडून चेतन तुपे तर महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप अशी लढत होती. यामध्ये मनसेचे साईनाथ बाबर व अपक्ष गंगाधर बधे यांनीही निवडणुकीत चुरस वाढविली. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून चेतन तुपे यांनी आघाडी घेत ती कायम ठेवली.
जल्लोष आणि घोषणा…
राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा विजय असो, आमदार चेतन तुपे पाटील, आमदार योगेश आण्णा आणि नाना भानगिरेंचा विजय असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, आठवले साहेब यांचा विजय असो, देश का नेता कैसा हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी जैसा हो, एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या.
“चेतन तुपे यांना पुन्हा निवडून दिल्याबद्दल सर्व जनतेचे आभार. ही निवडणूक केवळ विकासासाठी व हिंदुत्वासाठी लढवली गेली आणि त्याचे सार्थ्य या विजयाने झाले. सर्व मतदारांच्या विश्वासाने आणि पाठिंब्याने हा विजय शक्य झाला. या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू.” – योगेश टिळेकर, आमदार, विधान परिषद
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वासाची मोहोर लावली आहे. शहरात महायुतीला चांगले यश मिळाले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातही निवडणूक कार्यकाळात शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र लढत होता. शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा, कोपरा सभा, बैठका, पदयात्रा घरोघरी भेटीगाठी तसेच सरकारचे काम मतदारांपर्यंत पोहोचवून चेतन तुपे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते.” – प्रमोदनाना भानगिरे, शहरप्रमुख, शिवसेना





