रोम : विश्वासदर्शक ठरावावरील मतदानावर आघाडीतील प्रमुख मित्रपक्षांनी साथ न देता अनुपस्थिती लावल्याने इटलीमध्ये आज पंतप्रधान मारियो द्राघी यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले. त्यामुळे मारिओ द्राघी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे देशात लवकर निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि निर्णायक वेळी इटली आणि युरोपसाठी अनिश्चिततेचा नवा काळ सुरू झाला आहे.
गेल्या तीन वर्षांत इटलीमध्ये पडणारे हे तिसरे सरकार आहे. क्विरिनाले पॅलेस येथे सकाळच्या बैठकीत द्राघी यांनी आपला राजीनामा अध्यक्ष सर्गियो मैत्तरेला यांच्याकडे सुपूर्द केला. मैत्तरेला याच्या कार्यालयाने सांगितले की, राष्ट्रपतींनी राजीनाम्याची दखल घेतली आहे आणि द्राघी सरकारला काळजीवाहू सरकार म्हणून काम करण्यास सांगितले आहे.
मारियो द्राघी 2021 पासून इटलीच्या पंतप्रधानपदी विराजमान होते. द्राघी हे युरोपियन सेंट्रल बँकेचे माजी प्रमुख आहेत. त्यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या पाठिंब्याने एकता सरकार स्थापन केले होते. परतुं आज सत्तेत असणाऱ्या त्यांच्या युतीमधील मित्र पक्षांनी विश्वासदर्शक ठरावात भाग न घेतल्याने पंतप्रधान मारियो द्राघी यांच्या नेतृत्वाखालील युतीचे सरकार कोसळले. त्यामुळे नाईलाजाने मारियो द्राघी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.