Lonavala Municipal Council: आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले; विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर
Lonavala Municipal Council : आमदार सुनील शेळके यांच्यावर जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने टीका केली जात असल्याचा आरोप

लोणावळा – लोणावळा नगरपरिषदेच्या कारभारावर भारतीय जनता पक्षासह विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली.
नागरिकांनी विकासकामांसाठी निवडून दिले असून, विरोधकांवर टीका करण्यात वेळ घालवण्यासाठी नाही, अशी भूमिका नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य समिती सभापती धनंजय काळोखे यांनी मांडली.
काळोखे यांनी विरोधकांच्या टीकेवर आक्षेप घेताना, लोणावळ्यातील काही व्यक्तींच्या सांगण्यावरून आरोप केले जात असल्याचा दावा केला. संबंधित व्यक्तीला दरमहा एक लाख रुपयांचा हप्ता मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार सुनील शेळके यांच्यावर जाणीवपूर्वक आणि राजकीय हेतूने टीका केली जात असल्याचा आरोपही काळोखे यांनी केला. विरोधकांनी टीका करायची असल्यास ती विकासकामांवर करावी. व्यक्तींना लक्ष्य करून जाणीवपूर्वक टीका करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देवीदास कडू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) लोणावळा शहराध्यक्ष रवि पोटफोडे, धनंजय काळोखे, सनी दळवी, जीवन गायकवाड, अनिल गवळी, निखिल कविश्वर, मुकेश परमार, मंगेश मावकर, आरती तिकोणे, वसुंधरा दुर्गे, सोनाली मराठे आणि वैशाली मोगरे आदी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, आगामी काळात या वादाला कोणते वळण मिळते, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.





