बारामतीतील नागरिकांना पोलिसांची तंबी

बारामती : कोरोनचा प्रादुर्भाव वाढत असताना देखील बारामती शहरात मॉर्निंग वॉकला जाऊन रस्त्यावर गर्दी करणाऱ्या बारामतीकरांना उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी चांगलीच अद्दल घडवली. बारामतीकरांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर नेऊन त्यांच्याकडून योगासने करून घेतली; तसेच कारवाईचा धाक दाखवून यापुढे घराबाहेर पडणार नाही अशी शपथ त्यांच्याकडून घेतली. शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा देखील यात समावेश आहे.
शहरातील ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाय योजना राबवल्या जात आहेत. शहर सीलबंद असतानादेखील मॉर्निंग वॉकला नागरिक गर्दी करत आहेत. हे चित्र पाहून उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर बारामतीकरांवर चांगलेच भडकले. आम्ही मूर्ख आहोत काय ? देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, पोलिस, प्रशासन तसेच सगळी माध्यमे घरात थांबा असे सांगत आहेत, ते तुम्हाला समजत नाही का ? तुम्हाला असं वाटत का की तुम्हाला कोरोना होणारच नाही.
तुमच्यामधील एक जण तरी असा आहे की तो उठून सांगू शकेल की मी कोरोनाग्रस्तांच्या फिरलो तरी मला कोरोना होणार नाही. तुम्हाला घरात बसून खूप कंटाळा आला असेल तर ससून रुग्णालयात लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला पाठवून देतो. नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे. का तुम्ही रस्त्यावर येता अशा शब्दात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मॉर्निंग वॉकला येणा-या अतिउत्साही बारामतीकरांची हजेरी घेतली.
कारवाईचा धाक दाखवून 313 जणांची त्यांनी शपथेवर मुक्तता केली. इव्हिनिंग वाॅकवरही पोलीस नजर ठेवून आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शेलार, फौजदार पदमराज गंपले, सचिन शिंदे, रमेश भोसले यांच्यासह 50 पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह ही कारवाई करण्यात आली.





