Pune News : पोलीस भरती करणार्या विद्यार्थ्यांना पैलवानांकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळजाई टेकडी येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही पैलवानांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ही घटना मंगळवारी घडली असल्याची माहिती आहे.
याबाबत एका विद्यार्थिनींनी सांगितले की , सुमारे दीडशे ते दोनशे विद्यार्थी नेहमीप्रमाणे तळजाई टेकडीवर वर्कआउट करण्यासाठी आले होते. सर्व विद्यार्थी हे पुणे फिटनेस क्लब या अकॅडमी चे विद्यार्थी आहेत. मुजीब पठाण हे या अकॅडमीचे संचालक आहेत.
विद्यार्थिनीने सांगितले की, सकाळी नेहमीप्रमाणे वर्कआउट करण्यासाठी आलो असता अचानक काही पहिलवान आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. तसेच मुलींकडे बघून शिवीगाळ केली आज त्यांच्या दिशेने दगडफेक केली. तसेच, अकॅडमीचे संचालक मुजीब पठाण यांनाही पैलवानांनी मारहाण केली. मात्र त्यांनी तसे का केले याचे कारण समजू शकले नाही.
दरम्यान, हे पहिलवान हनुमान आखाडा आणि मामासाहेब मोहोळ आखाड्यातील असल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला. तसेच मारहाण करताना आमच्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी राहुल आवारे आणि विजय चौधरी यांचा हात असून तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी देखील या पैलवानांनी दिल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देणार असल्याचे विद्यार्थिनींने सांगितले.





