Police Recruitment 2026 : पुणे पोलीस भरतीला ‘या’ तारखेपासून सुरुवात; १.७५ लाखांहून अधिक उमेदवारांमध्ये चुरस
Police Recruitment 2026 : १,७७१ पदांसाठी १.८५ लाख अर्जा; कारागृह आणि पोलीस शिपाई भरतीसाठी पुण्याचे मैदान सज्ज.

Police Recruitment 2026 – पुणे पोलीस दलातील पोलीस भरती प्रक्रियेचा प्रारंभ १६ फेब्रुवारीपासून होत आहे. पोलीस दलातील १,६३३ पोलीस शिपाई, १०५ वाहनचालक, ३३ बँडमन अशा जागांसाठी एक लाख ३९ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कारागृहातील १३३ शिपायांच्या भरती प्रक्रियेत ४६ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, तसेच रामटेकडीतील राज्य पोलीस दलाच्या मैदानावर होणार आहे. १६ फेब्रुवारीपासून शारिरिक चाचणी सुरू होणार असून, त्यानंतर लेखी परीक्षा आयोजित केली आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी दिली.
मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्याटप्याने जाहीर केले जाणार आहे. अधिकृत संकेतस्थळ, संदेशाव्दारे उमेदवारांना माहिती दिली जाणार आहे. शारिरिक चाचणीत उमेदवारांची छाती, उंची मोजण्यात येणार आहे.
१०० मीटर, १६०० मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर ), गोळाफेक अशा घटकांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रियेत गैरप्रकार होऊ नये म्हणून आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आ्हे. संपूर्ण भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धावण्याची वेळ, चाचणीतील कामगिरी याची अचूक वेळ नोंदविता येणार आहे.
भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे, असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी नमूद केले.लेखी परीक्षेच्या टप्यात विशेष उपायोजना करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा धेणाऱ्या अधिकाऱ्यांना मोबाइल क्रमांक वापरण्यास मनाई केली आहे.
परीक्षेच्या ठिकाणी बंदोबस्त आहे. गैरप्रकारांवर नजर ठेवण्यात येणार आहे. उमेदवारांनी मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये. गैरप्रकार आढळून आल्यास त्वरीत मोबाइल क्रमांक – ७३९१०८२६११ वर संपर्क साधावा, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील यांनी केले आहे.





