Nagar | अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर पोलिसांचे छापे

नगर, (प्रतिनिधी) – शहरात दोन ठिकाणी सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलींग सेंटरवर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने गुरूवारी (दि.१०) दुपारी छापेमारी करून १ लाख ६५ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अंमलदार संतोष ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरून सुनील लांडगे (पूर्ण नाव पत्ता नाही) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लांडगे हा बुरूडगाव रस्त्या, गजराज ड्रायक्लीन समोर शेख (गुलशनवाले) यांच्या जागेमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलींग सेंटर चालवित होता.
पथकाने गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. छापा टाकताच पोलिसांना पाहून लांडगे पसार झाला. पोलिसांनी सदर ठिकाणाहून १ गॅस रिफिलींग मशीन, ८ गॅस टाक्या असा ५६ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याच पथकाने दुसरी कारवाई सायंकाळी पाचच्या सुमारास सावेडी उपनगरातील जय आनंद हॉटेलच्या पाठीमागील एका पत्र्याच्या शेडवर केली. त्या ठिकाणी किरण बबन दंडवते (वय ४० रा. सावेडी गाव) हा अवैधरित्या गॅस रिफिलींग चालवित असल्याचे दिसून आले.
त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून रिक्षा, गॅस टाकी व इतर साहित्य असा १ लाख ९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार हेमंत खंडागळे यांच्या फिर्यादीवरून दंडवते विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





