Pune News : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड; भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

Pune News : रेव्ह पार्टीप्रकरणानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत मोठा अंमली साठा जप्त केला होता. आता सोमवारी पुणे पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं आहे. त्याच्यासोबत २ ते ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अटक केलेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव औंदुबर विठ्ठल कांबळे असे आहे. कांबळे हा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा भाजपचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे. सोमवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी जुगार खेळताना या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. कांबळेसह या सर्वांविरोधात सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांबळे त्याच्या इतर दोन ते तीन सहकाऱ्यांसोबत तळजाई परिसरात असणाऱ्या एका रिकाम्या कारखान्यात रमी खेळत होता. यावेळी सहकार नगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट २ ने येथे छापा टाकला. त्यावेळी हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे पोलिसांना आढळून आले. दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापेमारी केली होती. या छाप्यात सहाय्यक पोलिस फौजदाराला पोलिसांनी रंगेहाथ पडकडले होते.
हेही वाचा : अणुबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकला भारताच्या सडेतोड उत्तराने लागली मिरची ; पुन्हा ओकली गरळ





