वाघोली – वाघोलीतील राजेश्वरी नगरीमधील आलोवेरी सोसायटीत एका फ्लॅटवर पोलिसांनी छापा टाकून तडीपार आणि सराईत गुन्हेगारांकडून चार पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणात वाघोलीतील तिघांना आणि पिस्तूल विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक करून वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२ ने केली.
अटक करण्यात आलेले आरोपी –
अटक करण्यात आलेल्यांमध्ये गोपाळ संजय यादव (वय २४), अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३), इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, तिघेही रा. वाघोली) आणि देवानंद शिवाजी चव्हाण (वय २३, रा. शिरुर) यांचा समावेश आहे.
कारवाईचा तपशील –
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, वाघोलीतील एका फ्लॅटमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार एकत्र जमले असून त्यांच्याकडे शस्त्रे आहेत. या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून फ्लॅटवर छापा टाकला. तिथे यादव, पटेल आणि पंदी आढळले. त्यांच्याकडून चार पिस्तुले आणि आठ काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत पिस्तुले देवानंद चव्हाण याच्याकडून विकत घेतल्याचे उघड झाल्याने त्याला कोंढापुरी येथून ताब्यात घेण्यात आले. चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.
आरोपींचा गुन्हेगारी इतिहास –
गोपाळ संजय यादव: दरोडा, खुनाचा प्रयत्न, दंगल यासह दोन गंभीर गुन्हे दाखल.
अमन ऊर्फ मुन्ना दस्तगीर पटेल: अहिल्यानगर आणि लोणीकंद पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट आणि तडीपारसह तीन गुन्हे नोंद.
इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी: मोक्का, दरोडा, आर्म अॅक्ट आणि तडीपार असे पाच गंभीर गुन्हे दाखल.
या कारवाईने वाघोली परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यात पोलिसांना यश आले असून, पुढील तपास सुरू आहे.