Big Action: भाजप नेता चालवत असलेल्या वेश्यागृहावर पोलिसांचा छापा; 73 जणांना अटक

शिलाॅंग – मेघालयात भाजपच्या एका नेत्याने चालवलेले वेश्यागृह पोलिसांनी उघड केले आहे. या कारवाई दरम्यान 6 बालकांना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 73 जणांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. हे वेश्यागृह चालवणाऱ्या भाजपच्या नेत्याचे नाव बर्नार्ड एन मराक असे आहे आणि ते मेघालय भाजपचे उपाध्यक्ष आहेत, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
मराक हे पूर्वी दहशतवादी होते. त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्या रिंपू बगान या फार्महाऊसमध्ये हे वेश्यागृह चालवले जात होते. गोपनीय महितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा घातला, असे वेस्ट गारो हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विवेकानंद सिंह यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
या फार्म हाऊसमध्ये 36 छोट्या खोल्या आहेत. या ठिकाणी मुलींचे लैंगिक शोषण केले जात असल्याच्या संशयावरून फेब्रुवारीमध्ये एक प्रकरण दाखल करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनी मुली या फार्म हाऊसमध्ये असल्याचे शोधून काढले होते. येथील लहान मुलांचेही अनेकवेळा लैंगिक शोषण झाल्याचा संशय आहे. भारतीय दंड संहिता आणि बाल लैंगिक गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्ह्याचे प्रकरण दाखरल करण्यात आली आहे आणि या कारवाईदरम्यान 73 जणांना अटक करण्यात आली आहे, असे पोलीस अधिक्षक विवेकानंद सिंह यांनी सांगितले.
अंधाऱ्या केबिनमध्ये मुलांना कोंडून ठेवले होते
या छाप्याच्यावेळी 6 लहान मुलांना सोडवण्यात आले आहे. त्यात 4 मुलगे आणि 2 मुली आहेत. या सर्वांना रिंपू बगानमधील अंधाऱ्या केबिनमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. या सर्व मुलांना जिल्हा बाल सुरक्षा अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. छाप्याच्यावेळी 27 वाहने, 8 दुचाकी, 400 बाटल्या मद्य, धनुष्यबाणदेखील जप्त करण्यात आले आहेत,
बंडखोर गटाचे एकेकाळचे नेते
मरक हे गारो आदिवासी स्वायत्त जिल्हा परिषदेतील निवडलेले सदस्य आहेत. आपल्या फार्म हाऊसवरील छाप्याच्या कारवाई संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण काहीही चुकीचे केलेले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र पोलिसांनी मरक यांना तपासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मरक यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरुपाची 25 प्रकरणे दाखल आहेत. “अचिक नॅशनल व्होल्युएंटरी कौन्सिल’ या एकेकाळच्या बंडखोर गटाचे ते स्वयंघोषित अध्यक्ष आहेत. ही संघटना आता विसर्जित करण्यात आली असून मरक यांनी भाजपबरोबर राजकारणात प्रवेश केला आहे. संगमा यांच्या नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रॅटिक आघाडीमध्ये भाजप हा एक घटक पक्ष आहे.





