Pune news : पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; पोलिस दलात खळबळ

पुणे : पुणे पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पोलीस मुख्यालयात नियुक्तीला असलेल्या एका पोलीस कर्मचार्याने राहत्या घरी टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वरुप विष्णु जाधव (वय.28) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे.
जाधव हे 2023 मध्ये पुणे शहर पोलीस दलात भरती झाले होते. सोमवारी (दि.7) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट येथील पोलिस वसाहतीत हा प्रकार समोर आला. याप्रकरणी, खडक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, जाधव यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी जाधव हे मुळचे ते कोल्हापूर येथील कसबा बावडा येथे राहणारे आहेत. कोल्हापूरला त्यांचे आईवडिल राहतात. सध्या ते स्वारगेट पोलीस वसाहतीत बिल्डिंग नंबर 6 मधील रुम नंबर 384 मध्ये दोघा मित्रासोबत रहात होते. तेथील परिसरात राहणार्या एका पोलिस कर्मचार्यांना रुम क्रमांक 384 मधून काही तरी जळाल्यासारखा वास आला.
त्यामुळे त्यांनी काय झाले हे पाहण्यासाठी त्या खोलीकडे गेले. बराचवेळ कोणी दरवाजा उघडला नाही . त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, जाधव यांनी खिडकीला टॉवेलच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबात पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली होती. त्यानुसार खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.





