सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. राजकोट येथे पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात सिंधुदुर्ग पोलिसांनी वैभव नाईक यांना चौकशीबाबत नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आमच्याकडून चौकशी सुरू आहे. पुतळा बांधकामात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तुमच्याकडे पुरावे असल्याचे पत्रकार परिषदेत म्हणाला होतात. त्यामुळे तुमच्याकडे असलेले पुरावे आम्हाला देऊन चौकशीसाठी सहकार्य करावे. आम्ही पुतळा कामातील भ्रष्टाचार समोर आणत असल्याने पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली आहे. पुतळ्याचे काम चांगले न केल्याचे समितीच्या अहवालात सांगण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारण्यात आला तर त्याचे बिल का देण्यात आले? असा सवालही नाईक यांनी विचारला आहे. सादर केलेला अहवाल खरा असेल तर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.