Satara: वाईत रोडरोमिओंवर पोलिसांचा कडक वॉच! गैरप्रकार करणार्यांची गय नाही
Satara शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात काही युवकांकडून विनाकारण टोळक्याने थांबणे, विद्यार्थिनींची छेडछाड करणे, शेरेबाजी करणे, पाठलाग करणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणे तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालवून ध्वनीप्रदूषण करणे, अशा तक्रारी पोलिसांकडे येत होेत्या, यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

Satara: वाई शहरातील शाळा, महाविद्यालये, एस.टी. स्टँड परिसर तसेच शैक्षणिक परिसरात विनाकारण घोळक्याने फिरणार्या, दहशत निर्माण करणार्या आणि विद्यार्थिनींची छेडछाड करणार्या रोडरोमिओंवर पोलिसांनी आता करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्या युवकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात काही युवकांकडून विनाकारण टोळक्याने थांबणे, विद्यार्थिनींची छेडछाड करणे, शेरेबाजी करणे, पाठलाग करणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणे तसेच सुसाट वेगाने दुचाकी चालवून ध्वनीप्रदूषण करणे, अशा तक्रारी पोलिसांकडे येत होेत्या, यामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर वाई पोलिसांनी शैक्षणिक परिसरासह शहरातील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवून अशा युवकांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. कायदा हातात घेणार्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नाही. युवकांनी वेळीच आपले वर्तन सुधारावे, असा इशारा पोलीस उप अधीक्षक सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे.
दरम्यान, वाई एस.टी. स्टँड परिसरात युवकांमध्ये किरकोळ बाचाबाची व भांडणांचे प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून दररोज कारवाया करण्यात येत आहेत. अशा प्रकारांना आळा बसला नाही, तर राडा करणार्या युवकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संशयास्पद हालचाली, रोडरोमिओंचा त्रास किंवा विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्यास पालक, शिक्षक आणि नागरिकांनी तातडीने वाई पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
अल्पवयीन मुलांना वाहन देणार्या पालकांवरही गुन्हे
अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणार्या पालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलीस उप अधीक्षक सुनील साळुंखे यांनी केले आहे.





