पुणे | गुन्ह्यांत सहभागी पोलीस यापुढे थेट बडतर्फ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यात महिलांविरोधातील गुन्हे, पॉक्सो संदर्भातील गुन्हे आणि ड्रगचे गुन्हे चिंताजनक आहेत. ते दाबून न ठेवता तातडीने दखल घेण्याची भूमिका आहे. ते दाबून ठेवले, तर भविष्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील.
यामुळे या तिन्ही गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा सहभाग आढळला तर त्यांना थेट बडतर्फ करण्यात येणार आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुणे पोलिसांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर फडणवीस म्हणाले, “देशातील अत्याधुनिक सायबर सेंटर ७५० कोटी रुपये खर्च करुन मुंबईत उभारण्यात येणार आहे. येथे जगातील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान असणार आहे. याला बँका, समाज माध्यमे आणि इतर गोष्टी संलग्न असतील.
यामुळे कोणी सायबर फ्रॉडची तक्रार करताच तातडीने संबंधित बँक खाते निष्क्रीय करता येईल. सध्या सायबर फ्रॉडची रक्कम दोन तासांतच परदेशात जाते. त्याच प्रमाणे सीसीटीव्हीमध्ये “एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
एखाद्या गुन्हेगाराने चेहरा बदलला तरी त्याला कॅमेरा डिटेक्ट करेल. याचा फायदा वाहतूक व्यवस्थापनालाही होणार आहे. याबरोबरच अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे घेण्यात येणार आहेत. ते गणेश विसर्जन मिरवणूक आणि राजकिय मोर्चे, आंदोलने यांच्यावर देखरेखीचे काम करतील.’
पुणे शहराला बदनाम करू नका : पोलीस आयुक्त
पोर्शे कार अपघाताची दुर्दैवी घटना शहरात घडली. यासंदर्भात पोलिसांवर टीका झाली, तसेच अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले. मात्र, पोलिसांनी तत्पर भूमिका घेत मुलाच्या आई-वडिलांना, ससूनच्या डॉक्टरांना आणि मध्यस्थांना अशा ९ जणांना अटक केली.
मागील चार महिने आरोपींना जामीन न मिळाल्याने ते कारागृहातच आहेत. मृत व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत.
यावरुन आम्ही सिद्ध केले की, आरोपी कितीही मोठा असला तरी न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही. यामुळे एखाद्या घटनेवरुन पुणे शहराचे नाव बदनाम करू नये, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.
बोपदेव घाटासारखी घटना टाळण्यासाठी आम्ही घाट परिसर आणि दुर्गम भागाचे सुरक्षा ऑडिट केले आहे. तेथे वीज, सीसीटीव्ही, पी.ए.सिस्टिम आणि व्हिजिबल पोलिसिंग अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
बोपदेव घाटात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली. अशा घटना घडू नये म्हणून ब्लॅक स्पॉट शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. तेथे वीज, सीसीटीव्हीबरोबरच नाइट व्हिजन कॅमेराही लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन कोणी गुन्हेगारी कृत्य करणार नाही. – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री, महाराष्ट्र





