पुणे जिल्हा | गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस तल्लीन

शिक्रापूर, (वार्ताहर)- पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही सण- उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते.
मात्र, शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करीत गणेशोत्सवाचा आनंद घेतला.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव साजरा करत गणेशाची प्रतिष्ठापणा केली होती, दररोज पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सध्या सर्वत्र गणरायाचा विसर्जन सोहळा सुरु होणार असल्याने पोलिसांना बंदोबस्तावर हजर रहावे लागणार आहे.
यावेळी शिक्रापूर पोलिसांनी फेटे बांधत गणपतीची पारंपारिक वाद्यच्या तालात मिरवणूक काढत मोठ्या जल्लोषात गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, राहुल देशमुख, महिला सहायक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले,
पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, महेश डोंगरे, यांसह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी सहभागी झाले होते.
दरम्यान, अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी मिरवणुकीमध्ये नाचण्याचा आनंद घेतला. सर्व पोलिसांना फेटे बांधलेले असल्याने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघाल्याने मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी कोणत्याही उत्सवाचा आंनंद आम्हाला घेता येत नसतो. मात्र आज गणेशोत्सवाचा आनंद साजरा करता येत असल्याचे समाधान आम्हाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.




