Pune News | नागपूर शहरातील महाल भागातील झेंडा चौकात काल रात्री १७ मार्च रोजी दोन गटातील संघार्षाने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन गटात झालेल्या संर्घषात येथील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पांगवण्याठी पोलिसांकडून अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.
या दरम्यान वरिष्ठ दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या हातावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला. तसेच या घटनेत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. या घटनेनंतर आता पुणे शहरात सतर्कतेचे आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील बंदोबस्त वाढवण्यात आला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे. पुण्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तर संवेदनशील ठिकाणांवर गस्त वाढविली असून, रात्रीपासून शहरातील वेगवेगळ्या भागात बंदोबस्त ठेवला आहे. या भागातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही अनुचित घटना प्रकार घडल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाच्या (क्रमांक ११२) संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.