पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दृष्टीहीन बांधवांसोबत घेतला धूलिवंदनाचा आनंद

पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दृष्टीहीन बांधवांसोबत धूलिवंदनाचा सण आनंदात साजरा केला. दृष्टिहीन व्यक्तीकडे दृष्टी नाही मात्र दूरदृष्टी आहे. रंगांची ओळख नसली तरीही या व्यक्ती आयुष्यात सप्तरंग भरत असतात. यासाठी आपण त्यांच्याकडून खूप काही शिकायला हवे, असे मत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
चिंचवडमधील पोलीस आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (दि. 18) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आस्था हॅंडीक्राफ्ट्समधील दृष्टीहीन बांधव या वेळी उपस्थित होते. अमृता क्षेत्रे या विद्यार्थिनीने प्रार्थनेतून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
दृष्टिहीन असलेल्या संदीप भालेराव, अशोक जाधव, तृप्ती भालेराव, गोरख घनवट यांनी आपल्या सुरेल आवाजात गेलेल्या गाण्यानी कार्यक्रमाची रंगत वाढविली. कृष्ण प्रकाश यांनी रंगांची ओळख देत सर्व दृष्टीहीन व्यक्तिच्या चेहऱ्यावर रंग लावले. यामुळे भावुक झालेल्या दृष्टिहीन व्यक्तीनी आयुक्तांना रंग लावत शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी दृष्टिहीन कल्याण संघाच्या संतोष राऊत याने आपले मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन आस्था हॅंडीक्राफ्ट्सचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ यांनी केले. सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





