प्रभात वृत्तसेवा पुणे – कोथरूड परिसरात तीन मुलींवर झालेल्या कथित मारहाण आणि जातिवाचक अपमान केल्याप्रकरणात न्यायालयाने कोथरूड पोलिसांना मोठा दणका दिला आहे. महिलांना मारहाण, जातिवाचक शिवीगाळ आणि लैंगिक अपमान केल्याच्या प्रकरणी शिवाजीनगर न्यायालयाने पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांची भूमिका या प्रकरणात संशयास्पद असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले आहे. छ्त्रपती संभाजीनगर येथून पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात आलेल्या एका विवाहित महिलेला आणि तिला आधार देणाऱ्या तीन मुलींना कोथरूड पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन अत्यंत हीन वागणूक देण्यात आली होती. कोणतेही वॉरंट नसताना पोलिसांनी या महिलांच्या घरात जबरदस्तीने घुसून मोबाइल, कपडे यांची झडती घेतली. त्यानंतर सर्वांना चौकशीच्या नावाखाली पाच तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. चौकशीदरम्यान शारीरिक व मानसिक त्रास देणे, जातिवाचक शिवीगाळ आणि लैंगिक अपमानकारक भाषेचा वापर केल्याचा गंभीर आरोप पीडितांनी केला होता.या प्रकारानंतर पीडित महिलांनी आणि त्यांच्या समर्थकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी जाणीवपूर्वक त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. पीडित मुलींनी न्यायासाठी थेट पोलीस आयुक्तालयात धरणे देत आवाज उठवला होता. सोशल मीडियावर श्वेता नामक सामाजिक कार्यकर्तीने केलेला व्हिडीओ व्हायरल झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर तसेच आमदार रोहित पवार यांनी थेट हस्तक्षेप केला आणि पीडित मुलींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेपर्यंत पोहोचले. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुलींच्या लढ्याला यश मिळाले आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या वतीने अॅड. परिक्रमा खोत, अॅड. अरविंद तायडे आणि अॅड. भाऊसाहेब अजबे यांनी काम पाहिले.