Satara: गणेशोत्सव निर्विघ्न करण्यासाठी पोलिस ‘ॲक्टिव्ह’, ६४९ उपद्रवींच्या हद्दपारीची तयारी; नोटिसा बजावण्यास सुरुवात
Satara गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात येत आहेत.

Satara: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याची शक्यता असलेल्या उपद्रवी व्यक्तींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील तिन्ही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून सुमारे ६४९ संशयित व उपद्रवी व्यक्तींच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी संबंधितांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात येत आहेत.
गणेशोत्सवात मिरवणुका, गणेश मंडळांचे विविध कार्यक्रम तसेच धार्मिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर होतात. या काळात किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर हाणामारी किंवा गंभीर गुन्ह्यात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पोलिसांच्या रेकॉर्डवरील तसेच यापूर्वी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आणि उपद्रवी वर्तनाची शक्यता असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली आहे. संबंधितांना पोलिस ठाण्यात बोलावून कायदेशीर प्रक्रियेनुसार नोटिसा बजावल्या जात आहेत. काही जण नोटिसा स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा वेळी त्यांना पोलिस ठाण्यात आणून नोटीस बजावण्याची कार्यवाही केली जात आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणू नये, यासाठी स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत.
हद्दपारीची ही प्रक्रिया एकाच वेळी न करता तीन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. संबंधितांवर कायद्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करून गणेशोत्सवाचा कालावधी शांततेत पार पाडण्याचे पोलिस प्रशासनाचे नियोजन आहे. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत संभाव्य उपद्रवी व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्याबरोबरच आवश्यकतेनुसार हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, अफवा पसरवू नयेत आणि कायदा- सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





