Brij Bhushan Sharan Singh – भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंग यांना पोक्सो कायद्यांतर्गत सुरू असलेल्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टाने बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला पोक्सो खटला बंद केला आहे. कोर्टाने या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेला रद्द अहवाल स्वीकारला आहे. दिल्ली पोलिसांनी १५ जून २०२३ रोजी या प्रकरणात रद्दचा अहवाल दाखल केला होता. सुनावणीदरम्यान, तक्रारदाराने पोलिसांच्या क्लोजर अहवालाला विरोध केला नाही. यापूर्वी १ ऑगस्ट २०२३ रोजी, कथित पीडिता आणि तिच्या वडिलांनी या प्रकरणात पोलिस अहवालावर आक्षेप घेतला नाही आणि पोलिस तपासावर समाधान व्यक्त केले. दरम्यान, कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर बृजभूषण शरण सिंग यांनी सत्य जिंकले आहे, सत्य कधीही पराभूत होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.