Indian Currency Notes : खिशातील नोटांमुळे ‘या’ गंभीर आजाराचा धोका; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Fungus-Bacteria on Indian Currency Notes : आपल्या खिशातल्या नोटा फक्त पैशाचं साधन नाहीत, तर त्या क्षयरोग (टीबी) सारख्या गंभीर आजारांचं कारणही ठरू शकतात. राजस्थानच्या किशनगड येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थानच्या बायोटेक्नॉलॉजी लॅबमधील संशोधनाने हा धक्कादायक खुलासा केला आहे. विशेषतः १०, २०, ५० आणि १०० रुपयांच्या नोटांवर धोकादायक बॅक्टेरिया आणि फंगस आढळले असून ते अनेक रोग पसरवू शकतात.
संशोधनात काय सापडलं?
एका वृत्तवाहिनीने दूधवाले, पाणीपुरी विक्रेते, दुकाने, रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स आणि पेट्रोल पंपांवरून गोळा केलेल्या नोटांचं परीक्षण केलं. यात ५ प्रकारचे फंगस – पेनीसिलियम, क्लेडोस्पोरियम, फ्यूजेरियम, एस्परजिलस आणि ट्राइकोडर्मा, तसेच ४ प्रकारचे बॅक्टेरिया – ई.कोलाई, स्टॅफिलोकोकस, क्लेबसिएला आणि स्यूडोमोनास आढळले आहेत. हे सूक्ष्मजीव डोळ्यांचा संसर्ग, फुफ्फुसांचे आजार आणि टीबीसारखे गंभीर आजार पसरवू शकतात.
नोटांवर बॅक्टेरिया का वाढतात?
चलनी नोटा कॉटन पेपरपासून बनतात, ज्या ओलावा शोषून घेतात आणि चिकट होतात. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस सहज वाढतात. नोटा मोजताना थुंकीचा वापर करणं हा संसर्गाचा धोका आणखी वाढवतो. डॉ. जयकांत आणि डॉ. जन्मेजय यांनी सांगितलं की, फंगल स्पोर ३-४ वर्षे टिकतात, तर टीबीचे बॅक्टेरिया २४-४८ तास नोटांवर जिवंत राहतात, ज्यामुळे रोग पसरण्याचा धोका वाढतो.
संशोधनाची पद्धत
संशोधनासाठी नोटांना सॅनिटाइज्ड कॉटनने स्वच्छ करून लॅमिनर फ्लोहुडमध्ये तपासलं गेलं. त्यानंतर ठोस एगर प्लेट्सवर ३७ डिग्री तापमानात ८-९ तास इनक्यूबेटरमध्ये ठेवलं. काही वेळातच बॅक्टेरियाची वाढ दिसून आली.
जागतिक चिंता
हा धोका फक्त भारतापुरता मर्यादित नाही. २०१७ मध्ये न्यूयॉर्कमधील चलनी नोटांवरील संशोधनातही त्वचेचे रोग, मुरुम आणि गंभीर संसर्ग पसरवणारे सूक्ष्मजीव आढळले होते.
काय करावं?
तज्ज्ञांनी सावधगिरीचा सल्ला दिलाय – नोटा मोजताना थुंकीचा वापर टाळा, वारंवार हात धुवा आणि शक्य तितकं डिजिटल पेमेंट वापरा. खिशातली नोट कधी तुम्हाला आजारी बनवेल, सांगता येत नाही.





