चीनमध्ये न्यूमोनिया उद्रेक; राज्यात अलर्ट

पुणे – चीनच्या ईशान्य भागात न्यूमोनियाचा उद्रेक होऊन रुग्णसंख्या वाढत आहे. या आधी करोनाचा अनुभव पाहता, भारतातही न्यूमोनियाबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्या आधारे राज्यांनीही उपाययोजनासंदर्भात सर्व जिल्ह्यांना आदेश देण्यात आले आहेत.
न्यूमोनिया आजाराचे प्रमाण मुख्यत: लहानमुलांमध्ये अधिक दिसते. हा संसर्ग इन्फ्लुएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, आरएसव्ही आणि कोविडमुळे होताना दिसत आहे. चीनमधील या उद्रेकाची भीती आपल्याला नसली, तरी या पार्श्र्वभूमीवर आपण आपली आरोग्य व्यवस्था पूर्व तयारी करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा विभागाच्या महासंचालकांनी राज्यांना कळवले आहे. त्या अनुषंगाने राज्याने जिल्ह्यांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना हे आदेश दिले आहेत.
“सारी’ सर्वेक्षण करा
प्रत्येक जिल्हा आणि महापालिकेने आपापल्या क्षेत्रातील श्वसनसंस्था आजारांचे सर्वेक्षण गांभीर्यपूर्वक करावे. आयएलआय/ सारी संदर्भातील माहिती आयडीएसपी पोर्टलवर अद्ययावत करावी. कोविड सर्वेक्षणासाठी ‘अॉपरेशनल गाइडलाइन्स फॉर रिवाइज्ड सर्विलन्स इन कंटेक्स्ट अॉफ कोविड – १९’ या राष्ट्रीय नियमावलीचा वापर करावा प्रयोगशाळा सर्वेक्षण – आपल्या कार्यक्षेत्रातील निदान प्रयोगशाळांना आयएलआय / सारी रुग्णांचे नमुने नियमितस्वरूपात पाठवण्यात यावेत.
हे आहेत आदेश
– रुग्णालयीन पूर्वतयारी – आपल्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये या पद्धतीचा उद्रेक हाताळण्यासाठी सुसज्ज ठेवणे गरजेचे आहे. मनुष्यबळ, त्यांचे प्रशिक्षण, अॉक्सिजन उपलब्धता, अॉक्सिजन प्लॅंट कार्यरत आहेत किंवा कसे, व्हेंटिलेटर उपलब्धता, अतिदक्षता विभागातील सिद्धता, रुग्णालयीन संसर्ग प्रतिबंधक यंत्रणा याबाबत आपण जातीने लक्ष घालून खातर जमा करावी.
– आरोग्य शिक्षण – जनतेने कोविड अनुरूप वागणे अंगीकारावे या संदर्भात त्यांचे प्रबोधन करण्यात यावी. विशेषत: श्र्वसनसंसर्ग असणाऱ्या व्यक्तींनी काळजी घेण्याबाबत भर द्यावा तसेच विनाकारण अफवा, भीती पसरणार नाही याची दक्षता घ्यावी.
औषध आणि इतर साधनसामग्री यांचा पुरेसा साठा
आवश्यक औषधांचा पुरेसा साठा, लसी, पीपीई किट, निदानासाठी लागणारे किट, अॉक्सिजन सिलिंडर्स आणि इतर बाबी पुरेशा प्रमाणात आहेत याची शहानिशा करावी. आवश्यक यंत्रसामग्री कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी. आवश्यक तेथे किरकोळ दुरुस्ती करून घ्यावी.





