Pimpri : प्रस्तावित रिंगरोडकडे पीएमआरडीएचे दुर्लक्ष

हिंजवडी : पुणे महानगर विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रस्तावित केलेला माण मधील ६५ मीटर रुंदीचा रिंगरोड येथील सोसायटी धारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. हा रस्ता दुरुस्त करून हजारों नागरीकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी येथील रेसिडेंट वेलफेयर असोसिएशनच्या वतीने पीएमआरडीएचे आयुक्त डॉ योगेश म्हसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेली पाच वर्षे पीएमआरडीए प्रशासन येथील नागरिकांची दिशाभूल करत आहे. हा रस्ता खाजगी बिल्डरच्या मालकीचा असल्याची कारणे देत जबाबदारी झटकत होते. मग या रस्त्यावर बांधकामं परवाने दिले कसे असा प्रश्न नागरीकांना पडला होता. संबधीत बिल्डर व प्रशासनातील अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याचे सोसायटीतील रहिवाशांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
या रस्त्यावर सध्या छोट्या मोठ्या १५ सोसायटी आहेत. त्यात २५०० फ्लॅट असून दहा हजार नागरिक वास्तव्यास आहेत. याठिकाणी कोहिनुर, शापूरजी पालमजी जॉयव्हीले यशवन जावडेकर सारख्या नामांकित विकासकांचे मोठमोठे बांधकाम प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर काही प्रगतीपथावर आहेत. 2016 साली शापुरजी पालमजी यांनी स्वखर्चाने हा डांबरी रस्ता बनविला होता. त्यानंतर प्रकल्प पूर्ण होताच त्यांनी रस्त्याची मालकी पीएमआरडीए कडे सुपूर्द केली. तेव्हापासून प्राधिकरणाने या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे सौजन्य देखील दाखवले नाही.
यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावर तुंबलेले पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी विकास प्राधिकरणाने केवळ एक ठिकाणी गटारवाहिनी टाकून जुजबी मलमपट्टी केली. मात्र गेल्या तीन महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे या मुख्य वर्दळीच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नित्याने गाडी घसरुन पडण्याच्या घटना घडत आहे. खड्डे चुकविताना या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.
काय आहेत रस्त्याच्या मुख्य समस्या
बांधकाम प्रकल्पावरील अवजड वाहनांमुळे रस्त्याची अवस्था बिकट
स्त्रिया, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, जेष्ठ नागरिकासाठी हा रस्ता त्रासदायक
या खड्डेमय रस्त्यालगत छोट्या मोठ्या सहा शाळा
याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही
प्रत्येक पावसाळ्यात होते पूर सदृश परिस्थिती
१५ सोसायट्यांचा इतर भागाशी पूर्ण तुटतो संपर्क
शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
आजारी व्यक्तींना उपचारासाठी कुठलाही नाही पर्याय
असोसिएशनच्या मागण्या
या रस्त्याची मालकी पीएमआरडीएने निश्चित करावी
सध्या रस्त्यावर झालेले खड्डे प्रशासनाने बुजवावेत
पुढच्या पावसाळ्यापर्यंत रस्ता वापरण्यायोग्य करावा
चार पदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता करावा
बिल्डरला रस्त्याच्या दुरुस्ती देखभालीची जबाबदारी द्यावी
आयटी पार्क लगतच्या या भागात मोठ मोठ्या रस्त्यांचे जाळे निर्माण होणार असल्याने कंपन्या पासून काही अंतरावर असलेल्या गृह प्रकल्पामध्ये फ्लॅट घेतले. परंतु रस्त्यांची दुरवस्था व प्रशासनाची उदासीनता पाहून आम्ही बिल्डर व प्रशासनाच्या चक्रव्यूहात अडकलो असल्याची भावना निर्माण होतेय. काहीजणांनी वैतागून इथला फ्लॅट भाड्याने देऊन औंध बाणेरला पसंती देत तिकडे ते भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले आहेत.
– महादेव धोत्रे, अध्यक्ष, रेसिडेंट वेलफेयर असोसिएशन, माण





