PMPML: सवाई गंधर्व महोत्सवासाठी PMPML ची स्पेशल ऑफर; रात्री ‘या’ वेळेत सुटणार बसेस

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शहरातील मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलात दि. १० डिसेंबरपासून ७१ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरवात झाली. या महोत्सवाला पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील विविध भागांतून रसिक श्रोते उपस्थिती लावतात. रात्री कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांना परतीच्या प्रवासासाठी पीएमपीएमएलकडून विशेष बसचे नियोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये दि. १० ते १४ डिसेंबरदरम्यान मुकुंदनगर येथून शहराच्या विविध भागांत बस सोडण्यात येणार आहेत. मुकुंदनगर ते निगडी भक्ती शक्ती (मार्ग क्र. ४२) ही बस दांडेकर पूल, डेक्कन, वाकडेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड स्टेशनमार्गे जाईल. मुकुंदनगर ते धायरी मारुती मंदिर (मार्ग क्र. ११७) बस दांडेकर पूल, विठ्ठलवाडी, आनंदनगर, वडगाव फाटा,
धायरी गावमार्गे जाईल. मुकुंदनगर ते कोथरूड डेपो (मार्ग क्र. १०३) बस टिळक रोड, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा,जयभवानीनगर, वनाज कंपनीमार्गे जाईल, तर मुकुंदनगर ते वारजे माळवाडी (मार्ग क्र. ७२) ही बस डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टँड, गांधी भवन, कर्वेनगरमार्गे जाईल.
त्यामध्ये दि. १०, १२ आणि १४ डिसेंबरला रात्री साडेदहा वाजता आणि दि. १३ डिसेंबरला रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून ही बस सुटेल. श्रोत्यांनी या विशेष बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


