Fake Bus Pass : बनावट पास दाखवून PMPMLमध्ये प्रवास; तरुणाविरुद्ध हडपसर पोलिसांत तक्रार
Fake Bus Pass : पीएमपीएमएलच्या अॅपवरून पास काढल्याचे भासवून बनावट एक दिवसाचा पास वापरून प्रवास केल्याचा आरोप. हडपसर पोलिसांत तरुणाविरुद्ध तक्रार दाखल.

Fake Bus Pass : पीएमपीएमएलच्या अधिकृत अॅपवरून पास काढल्याचे भासवून बनावट एक दिवसाचा बस पास वापरत प्रवास करणाऱ्या तरुणाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निशांत राजपाल कोल्हे ( २६, रा. हडपसर) असे या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पीएमपीएमएलचे बस चेकर संजय भगुजी अढाळगे (वय ५६) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २३) दुपारी चारच्या सुमारास पीएमपीएमएलच्या एमएच १२ एक्सएम ६९५८ या बसमधून कोल्हे प्रवास करत होता.
सर्व्हे क्रमांक १५ येथील पीएमपीएमएल बस थांब्यावरून तो बसमध्ये चढला होता. त्याने मोबाईल अॅपवरून एक दिवसाचा बस पास काढल्याचे वाहक अक्षय जायभाई यांच्या निदर्शनास आले. मात्र, हा पास बनावट अॅपवरून काढल्याचा संशय आल्याने त्यांनी गाडीतळ येथील बस चेकर संजय जाधव यांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर संबंधित तरुणाला बससह गाडीतळ डेपो येथे आणण्यात आले. तेथे पासची तपासणी केली असता तो बनावट असल्याचे आढळले. डेपो व्यवस्थापकांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बस चेकर संजय अढाळगे यांनीही पासची खात्री केली. त्यावेळी संबंधित तरुणाने बनावट पास तयार करून त्याचा वापर केल्याचे निदर्शनास आले.
या पासचा वापर करून अधिकृत पासधारक असल्याचे भासवत विनातिकीट प्रवास केल्याने पीएमपीएमएलचे ७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करीत आहेत.





