PMP: पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना मंजूर

कागदपत्रे जमा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत
PMP: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) आस्थापनेवरील सर्व पात्र सेवकांना पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तब्बल २९ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शनच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पेन्शन योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे संबंधित पीएमपी कार्यालयात सादर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला केवळ एक महिन्याची मुदत देण्यात आली होती.
मात्र, तांत्रिक अडचणी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने सहा महिन्यांपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना आवश्यक दाखले आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.
पीएमपीच्या स्थापनेपासून म्हणजेच तत्कालीन पीएमटी आणि पीसीएमटी काळातील शेकडो कर्मचारी या पेन्शन हक्कासाठी प्रदीर्घ लढा देत होते. अखेर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या म्हातारपणाची काठी सुरक्षित झाली आहे.





