प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने प्रशासनाकडून निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादीवर आलेल्या तब्बल ६५ हजार हरकतींपैकी ४७ हजार ६३ हरकती प्रशासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे ९२ हजार ४६६ मतदारांची नावे पुन्हा त्यांच्या मूळ प्रभागात समाविष्ट केली आहेत. या पुरवणी यादीस महापालिका आयुक्तांनी नुकतीच मान्यता दिली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश काढले आहेत.महापालिकेने २० नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यानंतर एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमांचा हवाला देत स्वतः मतदाराने तक्रार केल्यासच बदल करता येतो, अशी भूमिका सुरुवातीला महापालिकेने घेतली होती. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर अशा तक्रारी आल्याने मतदार पळवापळवीची दखल थेट निवडणूक आयोगाने घेतली. महापालिकेकडे आलेल्या सर्वसाधारण तक्रारींची सुमोटो दखल घेऊन त्यानुसार मतदारांची नावे योग्य प्रभागात समाविष्ट करण्याचे अधिकार आयुक्तांना असल्याचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेने हे बदल केले आहेत. त्यानुसार तब्बल ४३ हजार तक्रारींची स्वतःहून दखल घेतली. यासोबतच नागरिकांनी २२ हजार तक्रारी दाखल केल्या होत्या. अशा एकूण ६५ हजार तक्रारींचा अभ्यास करून प्रशासनाने त्यापैकी ४७ हजार हरकती मान्य केल्या, तर १८ हजार हरकती फेटाळल्या आहेत. मान्य झालेल्या हरकतींमुळे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेल्या सुमारे ९२ हजार ४६६ मतदारांची नावे पुन्हा त्यांच्या मूळ पुरवणी मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.