PMC News – तब्बल १२ हजार कोटींचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेच्या आर्थिक नियोजनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्थायी समितीत वर्णी लावण्यासाठी भाजपमध्ये रस्सीखेच आहे. १६ सदस्यांच्या या समितीत भाजपचे सर्वाधिक १२ सदस्य असणार असून, राष्ट्रवादीला ३, तर काँग्रेसला १ सदस्यपद मिळणार आहे. दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीकडून या १२ जागांसाठी २४ नगरसेवकांची प्राथमिक यादी प्रदेश भाजपकडे पाठविण्यात आली आहे. ही नावे उद्या (शुक्रवार) दुपारपर्यंत अंतिम होणार असून, तीन वाजता होणाऱ्या मुख्यसभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.त्यामुळे स्थायी समितीत कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही स्थायी समितीच्या जागांसाठी चढाओढ सुरू आहे. महापालिकेच्या स्थायी समितीसह शहर सुधारणा समिती, नाव समिती, महिला व बालकल्याण समिती, विधी समिती, क्रीडा समिती आणि शिक्षण समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी शुक्रवारी (दि. १३) दुपारी तीन वाजता सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत सर्व पक्षांकडून पक्षीय बलाबलानुसार आपली नावे महापौरांकडे दिली जाणार आहेत. सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भाजपने स्थायी समितीचे १२ सदस्य ठरविण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. या बैठकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दोन ते तीन नावे सुचविण्यात आली आहेत. काही नावे आमदारांनी, तर काही नावे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुचवली असून, या नावांमध्ये ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावाचा, तसेच इतर महापालिका निवडणूकीपूर्वी इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या काही नगरसेवकांचा समावेश आहे. स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, तर काँग्रेसला एक जागा आहे. या जागांसाठीही दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून,नेत्यांशी संपर्क साधून वर्णी लावण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. स्थायी समिती महत्त्वाची असल्याने त्या ठिकाणी महापालिकेच्या कामकाजाची माहिती असलेल्या नगरसेवकांनाच संधी मिळावी, यासाठी या दोन्ही पक्षांतील नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत.