PMC News – महापालिकेकडून शहरात रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या झाडांसह, विकासकामांसाठी तोडण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात शहरातील अनेक रस्त्यांकडेला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केले होते. या झाडांच्या देखभालीसह संबंधित रस्त्यांवर पदपथ, गतीरोधक, रस्त्याची दुरवस्था यावर लक्ष ठेवण्यासाठी पथविभागाकडून कनिष्ट अभियंता तसेच उपअभियंत्याकडे जबाबदारी देत त्याला रस्ते दत्तक योजना, असे नाव देत मोठ्या थाटात या मोहिमेची सुरूवात केली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच ही मोहीम गुंडाळण्यात आली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेसह लाखो रुपयांची खर्च करून लावलेले वृक्षही सुकुन गेले आहेत, अनेक ठिकाणी वाळलेली रोपेच शिल्लक आहेत. महापालिकेच्या पथविभागाने सहा महिन्यांपूर्वी शहरात हा उपक्रम राबविला होता. त्यावेळी प्रशासनाकडून शहरात अनेक प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे या कामात काढण्यात येणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात प्रशासनास मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करायचे होते. हे वृक्षारोपन केल्यानंतर अशी झाडे जगविणे पथविभागाची जबाबदारी होती. मात्र, त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने प्रशासनाने ही जबाबदारी संबंधित रस्त्यांचे काम सांभाळणाऱ्या कनिष्ट तसेच उपअभियंत्यांकडे सोपविली, त्यांनी संबधित झाडांची देखरेख, पाण्याची सुविधा तसेच आवश्यक त्या उपाय करणे आवश्यक होते. त्यासाठी अभियंत्यांना रस्तेही निश्चित करून देत पालकत्व देण्यात आले होते. क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ उपायुक्त तसेच महापालिकेच्या विभाग प्रमुखांनी या अभियंत्यावर लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, नव्याचे नऊ दिवस, या म्हणी प्रमाणे सहा महिन्यतच ही योजना प्रशासनाने गुंडाळली. पथविभागाकडूनही पुन्हा कधीच या योजनेचा आढावा घेण्यात आला नाही. त्यामुळे, वृक्षारोपन करण्यात आलेली सर्वच्या सर्व झाडे जळून गेली असून अनेक ठिकाणी झाडांना लावलेल्या संरक्षक जाळ्यांची चोरीही झाली आहे.