PMC News : एकाच दिवसात १०% काम कसं वाढलं? महापालिकेच्या नालेसफाईच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह
PMC News : महापालिका प्रशासनाकडून १५ जूनपर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचा दावा; अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली माहिती.

PMC News – ओढे, नाले, चेंबर सफाईचे कालपर्यंत (३१ मे पर्यंत) ७५ टक्के झालेले काम एका दिवसातच १० टक्क्यांनी वाढले असून, ते ८५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. उरलेले १५ टक्के येत्या १५ जूनपर्यंत पूर्ण करू, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी ही माहिती दिली.
पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, स्टॉर्म वॉटर लाइन, चेंबर्स आणि कल्व्हर्ट्सची सफाई ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या महापालिकेला हे काम दोन महिने आधी सुरू करूनही पूर्ण करता आले नाही. दररोज एक टक्क्याने काम झाल्याचे दाखवत प्रशासनाने हे काम ३१ मे पर्यंत ७५ टक्के झाल्याचा दावा केला. कागदी घोडे नाचवत आणि आकड्यांचा खेळ करत एकाच दिवसात म्हणजे एक जून रोजी हे काम थेट ८५ टक्के झाल्याचे सांगण्यात आले.
मात्र, प्रत्यक्षात शहरातील नाले, ओढे अद्यापही पूर्णपणे स्वच्छ झाले नसून, दरवर्षीप्रमाणे पहिल्याच पावसात महापालिकेचा फज्जा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने २८ मे, ३१ मे आणि १ जूनपर्यंतच्या कामांची आकडेवारी जाहीर केली. मात्र, या आकडेवारीतच विसंगती दिसून येत आहे. २८ मे रोजी नाले सफाईचे ७४ टक्के काम झाल्याचा दावा केला होता.
त्यानंतर तीन दिवसांत म्हणजे ३१ मे रोजी एकच टक्का काम झाल्याचे दिसून आले. त्यानंतर २४ तासांतच हे काम थेट ८५ टक्के झाल्याचे प्रशासन सांगत आहे. मात्र, शहरातील वास्तव पाहता हे आकडे कितपत खरे, असा सवाल उपस्थित होत असून, या आकडेवारीचा खेळ पहिला मुसळधार पाऊसच उघडे करू शकतो.
दरम्यान, येत्या १५ दिवसांत उरलेले १०० टक्के काम पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट करून अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यासाठी पाणी उपसण्याचे ३०-३५ पंप भाड्याने घेणार असून, ते १५ क्षेत्रीय कार्यालयांना देणार असल्याचे नायर यांनी नमूद केले.
“शहरात पावसाळापूर्व ५९ कामे सुरू आहेत. समन्वयाचा अभाव असून, सातत्याने आढावा घेऊन कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. काढलेला राडारोडा तातडीने हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत.”
– प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका




