PMC News – महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना शहर अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे पथ विभागाच्या प्रमुखपदी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश बनकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पथ विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. त्याचबरोबर बनकर यांच्याकडे वाहतूक नियोजन विभागाचाही प्रभारी पदभार देण्यात आला आहे.महापालिका आयुक्तांनी अभियांत्रिकी संवर्गातील अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल केला असून, त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता रोहिदास गव्हाणे यांच्याकडे यापूर्वी भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. मात्र, या व्यवस्थेत बदल करून आता गव्हाणे यांच्याकडे मलनिस्सारण, तसेच देखभाल व दुरुस्ती विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्याकडे बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. यापूर्वी त्यांच्याकडे दक्षता आणि भवन रचना विभागाची जबाबदारी होती. दरम्यान, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्याकडे असलेली मलनिस्सारण, तसेच देखभाल व दुरुस्ती विभागाची जबाबदारी बदलण्यात आली असून, आता त्यांच्याकडे भवन रचना विभागाच्या अधीक्षक अभियंता पदाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे.