PMC Fined To L and T Company : महापालिकेचा दणका! निकृष्ट रस्ते कामामुळे ‘एल अँड टी’ कंपनीला १५ लाखांचा दंड
PMC Fined To L and T Company : पावसाळापूर्व कामांच्या पाहणीत 'एल अँड टी'चा निष्काळजीपणा उघड; १५ लाखांच्या दंडासह दोषी ठेकेदारांवर कारवाईचे आदेश.

PMC Fined To L and T Company : समान पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी टाकल्यावर रस्ता दुरूस्तीत हयगय केल्याने एल अँन्ड टी कंपनीला १५ लाखांचा दंड ठोठावण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. पालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पाहणवेळी आयुक्तांना दुरूस्तीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आढळले. त्यांनी तात्काळ कंपनीस दंड आकारण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागास दिले.
पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी ही माहिती दिली. धायरीतील उंबऱ्या गणपती परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले होते. मात्र खोदलेला रस्ता दीर्घकाळ पूर्ववत केला नव्हता. मंगळवारी रात्री सिमेंट काँक्रिट टाकून रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र त्याला आवश्यक वेळ मिळावा आणि वाहतूक होऊ नये यासाठी कोणतीही व्यवस्था तेथे केली नाही.
परिणामी काही तासांतच नव्याने टाकलेले काँक्रिट उखडण्यास सुरुवात झाली. हे काम अवघे १०० ते १५० मीटरचे होते. प्रत्यक्षात हा रस्ता वर्दळीचा असल्याने ते व्यवस्थित करणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. शनिवारी महापालिका आयुक्त राम हे अतिरिक्त आयुक्तांसह कामांची पहाणी करण्यासाठी गेले असताना रस्ता दुरूस्त करून त्यावर टाकण्यात आलेले काँक्रिट कापडी पोत्यांनी झाकले होते.
ही पोती हटविण्यात आल्यानंतर काम निकृष्ट असल्याचे तसेच पायाने हालवूनही काँक्रिट निघत असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या पाहणीत दिसून आले. त्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी थेट १५ लाखांचा दंड आकारण्याचे आदेश दिले. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी कारवाईतून दिला आहे.




