प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या प्रभागांच्या आरक्षण सोडतीवर एकूण १८ हरकती प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींची तपासणी करून त्यावर निर्णय घेतल्यानंतर अहवाल महापालिकेकडून १ डिसेंबरपूर्वी राज्य निवडणूक आयोगास पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर केले जाणार आहे.महापालिकेच्या आगामी निवडणुका ४ सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने होणार आहेत. शहरातील लोकसंख्येनुसार १६५ नगरसेवकांसाठी ही निवडणूक होणार असून, ४० प्रभाग ४ सदस्यांचे तर एक प्रभाग ५ सदस्यांचा आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली होती, तर १७ नोव्हेंबर रोजी ती जाहीर करण्यात आली. हरकती व सूचनांसाठी २४ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस होता. त्यानुसार आतापर्यंत १८ हरकती प्राप्त झाल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे प्रमुख उपायुक्त प्रसाद काटकर यांनी स्पष्ट केले. या हरकतींची तपासणी करून अहवाल निवडणूक विभागाकडे सादर केला जाणार असून, गरज असल्यासच आवश्यक त्या शिफारसींचा अहवाल सादर केला जाईल, असे काटकर यांनी सांगितले. मतदारयादीवरील हरकती वाढल्या प्रभागनिहाय मतदारयादीवर मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे. प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर आज चौथ्या दिवसाअखेर एकूण ४१९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत.अनेक प्रभागांमध्ये मतदारयाद्यांचे चुकीचे विभाजन झाले असून, हद्द एका प्रभागात आणि मतदान शेजारच्या प्रभागात असल्याचे समोर आले आहे. याशिवाय शहराच्या एका भागातील मतदारांची नावे थेट दुसऱ्या भागात गेल्याचेही दिसून आले आहे. या प्रकरणी महापालिकेकडून निवडणूक आयोगाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. तसेच मतदार याद्यांचे विभाजन करताना हे पत्त्यानुसार न होता निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या यादी क्रमांकानुसार करण्यात आले आहे. परिणामी, काही नावे शेजारच्या प्रभागात न जाता इतर प्रभागात गेल्याचे निदर्शनास आले असून, त्याबाबत आयोगाला कळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.