प्रभात वृत्तसेवा पुणे – देशभरात मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदारांवरून आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच पुण्यात प्रारूप मतदार यादीत सुमारे ३५ लाख ५१ हजार मतदारांपैकी तब्बल ३ लाख ४६८ दुबार मतदार शोधण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार अशा दुबार मतदारांच्या नावापुढे दोन स्टार करण्यात आलेले आहेत.या मतदारांना महापालिकेचे कर्मचारी भेटून त्यांना कोणत्या तरी एकाच ठिकाणी मतदार करायला सांगतील. त्यासाठी त्यांच्याकडून तसा अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यामुळे एक मतदार दोन ठिकाणी मतदान करू शकणार नाही, असे नवल किशोर राम यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकांच्या आधी हे काम पूर्ण करण्याची महापालिकेवर मोठी जबाबदारी असणार आहे. हे काम पूर्ण न झाल्यास दुबार मतदान होणार नाही, यासाठी प्रशासनास विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. एकगठ्ठा हरकती स्वीकारणार नाही महापालिका प्रशासनाकडून यादीवर हरकती घेण्यासाठी मतदारांना विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, त्याच वेळी कोणत्याही परिस्थितीत एकगठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. चुकीच्या प्रभागात नाव समाविष्ट झाले असेल, त्यांनी नमुना हरकत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.ज्या तक्रारदारास अन्य मतदारांबाबत हरकत घ्यायची आहे, त्यांनी नमुना ब मध्ये मतदाराचे तपशील, त्याचे रहिवासाचे पुरावे, तसेच यादी भाग क्रमांकाची प्रत जोडून अर्ज करणे आवश्यक असणार आहे. याशिवाय एकच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या एकापेक्षा अधिक मतदारांचे नमुनामधील अर्ज त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिवांमार्फत त्या संस्थेच्या लेटरहेडवर संबंधित सचिव किंवा अध्यक्षाच्या स्वाक्षरीने एकत्रितपणे सादर करता येतील.