PMC Budget 2026 – महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पीएमपीच्या तिकिटात ५० टक्के सवलत, महिलांच्या नावावर मिळकत असल्यास ५०० चौरस फुटांच्या आतील मिळकतींना ५० टक्के करमाफी, महिलांसाठी शहरात १०० आधुनिक स्वच्छतागृहे अशा अनेक नव्या योजनांसह स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे १५ हजार ६६९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंगळवारी मुख्य सभेत सादर केले. एका बाजूला महापालिकेचे उत्पन्न ८ हजार कोटींचा टप्पा पार करेल की नाही, असे चित्र असतानाच आधीच आयुक्तांनी जवळपास साडेचारशे कोटींनी फुगविलेल्या अंदाजपत्रात भिमाले यांनी आणखी दीड हजार कोटींची भर टाकली आहे. आयुक्तांनी १३ हजार ९९५ कोटींचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात कुठे कात्री लावत, तर कुठे उत्पन्नाचे आकडे फुगवत भिमाले यांनी १,६७४ कोटी रुपयांची वाढ केली आहे. या अंदाजपत्रकात भांडवली व विकासकामांसाठी ७ हजार ६८७.८५ कोटींची तरतूद करण्यात आली. महिलांना पीएमपीत ५० टक्के सवलत. त्यात पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ५७३.७५ कोटी आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी २७६.७७ कोटी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय कर्जफेडीसाठी ८५२.२९ कोटींची तरतूद केली आहे. पर्यावरण, शिक्षण, आरोग्य योजनांसाठी विशेष निधी देण्यात आला असून, महापालिकेच्या शहरी गरीब योजनेसाठी अंदाजपत्रकात तब्बल १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेस स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना नाव देण्यात आले आहे. पीएमपीची तूट महापालिका उचलणार भिमाले यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात शहरातील महिला, तसेच ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी पीएमपीला येणारी तूट महापालिका उचलणार आहे. राज्य शासनाच्या एसटी तिकीट सवलतीच्या योजनेच्या धर्तीवर ही योजना राबविली जाणार असून, पुढील महिन्यात त्यासाठीचे धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. याशिवाय शहरात महिलांसाठी १०० ठिकाणी अद्ययावत स्वच्छतागृहे उभारली जाणार असून, शाळांमध्ये मुलींसाठी पिंक रूम ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. “हे अंदाजपत्रक पुढील पाच वर्षांच्या विकासाचे नियोजन लक्षात घेऊन करण्यात आले आहे. त्यात महिला सक्षमीकरण, आरोग्य व्यवस्था सक्षमीकरण, पुणेकरांसाठी नव्या योजना प्रस्तावित केल्या आहेत. याशिवाय महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी विशेष योजना प्रस्तावित आहेत. प्रामुख्याने महापालिका निवडणुकीत भाजपकडून मतदारांना अपेक्षित असलेल्या संकल्पनांचा यात समावेश आहे.” – श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष