PMC Abhay Yojana : कर वसुलीसाठी आता मिळकत जप्ती; अभय योजनेची मुदत १५ फेब्रुवारीला संपणार
PMC Abhay Yojana : निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मिळाली होती मुदतवाढ; आता १५ फेब्रुवारी हीच शेवटची तारीख, महापालिकेचे स्पष्ट आवाहन.

PMC Abhay Yojana : महापालिका प्रशासनाने मिळकतककराच्या थकबाकी वसूलीसाठी अभय योजना राबविली असून या योजनेला १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे योजनेत कर भरण्यासाठी आता अखेरचा आठवडा शिल्लक असून जास्तीत जास्त थकबाकीदारांनी कर भरावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.
योजनेची मुदत संपल्यावर मिळकतींच्या जप्तीची कारवाई सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.या योजनेत आतापर्यंत ७०० कोटींहून अधिक मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. मिळकतकर विभागाचे एकूण उत्पन्न २८०० कोटींच्यावर गेले आहे. या योजनेत मिळकतकरावर आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत ८० टक्के सूट देण्यात येत आहे.
महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी १३ हजार कोटींवर गेली आहे. त्यात, मोबाईल टाॅवर तसेच न्यायालयीन दाव्यांची थकबाकी सुमारे ८ हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे महापालिकेकडून कोणतेही वाद नसलेली ५ हजार कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी साडेचार लाख मिळकतधारकांसाठी अभय योजना लागू केली होती.
ही योजना १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी होती. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही अनेक नागरिकांनी महापालिका निवडणूकांच्या आचारसंहिता तसेच इतर कारणास्तव थकबाकी भरता आलेली नसल्याचे सांगत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, महापालिकेने योजनेस आता १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
मात्र, त्यानंतर या योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळला आहे. त्यामुळे प्रशासनाने आता या योजनेची मुदत संपताच मिळकतींच्या जप्तीची कारवाई सुरू करण्याचे नियोजन केले असून त्यासाठी कर निरिक्षकांकडे मिळकतींची यादीच देण्यात आली आहे. या योजनेस मुदतवाढ दिल्यानंतरही अनेक जण कर भरत नसल्याने प्रशासनाने गेल्या आठवडयात जवळपास १०० हून अधिक मिळकतींवर जप्तीची कारवाई केली असल्याचे करसंकलन विभागाकडून सांगण्यात आले.





