सिंगापूर- सिंगापूरमध्ये आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तारुढ पीपल्स ऍक्शन पार्टीकडून भारतीय वंशाचे मेदवार उतरवले जातील, असे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी म्हटले आहे. सिंगापूरच्या औद्योगिक, उद्योजकतेत आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रांसह सर्वच क्षेत्रांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांनी दिलेले योगदान ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे वोंग यांननी म्हटले आहे. सिंगापूरमध्ये २०२० साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएपीने २७ नवीन उमेदवारांना संधी दिली होती. मात्र भारतीय वंशाच्या कोणाही उमेदवाराला रिंगणात उतरवले नव्हते. त्यामुळे संसदेत भारतीय वंशाच्या प्रतिनिधीत्वाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र वोंग यांनी भारतीय तरुणांसमोर बोलताना भारतीय वंशाच्या समुदायाला निवडणुकीत उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन केले. भारतीय समुदायाचे प्रमाण जरी कमी असले, तरी या समुदायाने दिलेले योगदान लहान नाही. सिंगापूरला अनेक भारतीय नागरी सेवकांचा फायदा झाला आहे, असे ते म्हणाले. २०२४ मध्ये, सिंगापूरच्या लोकसंख्येत भारतीयांची संख्या ७.६ टक्के होती, तर मलय आणि चिनी लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे १५.१ टक्के आणि ७५.६ टक्के होते. २०२० मध्ये, पीएपीने संसदेत ८३ जागा जिंकल्या होत्या.