नवी दिल्ली : सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. वोंग यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि परराष्ट्र मंत्री विवियन बालकृष्णन आणि वाहतूक आणि अर्थमंत्री जेफ्री सिओ यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या या दौऱ्या दरम्यान भारत आणि सिंगापूर दरम्यान जहाजबांधणी, नागरी विमान वाहतूक आणि अंतराळ यासारख्या क्षेत्रातील संबंधांना चालना देण्यासाठी पाच करार केले जातील. पंतप्रधान म्हणून वोंग यांच्या पहिल्या भारत भेटीचा एकंदर उद्देश दोन्ही बाजूंमधील मूलभूत पूरकतेच्या आधारावर द्वि-मार्गी आर्थिक संबंध वाढवण्याचे मार्ग शोधणे असेल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वोंग गुरुवारी व्यापक चर्चा करतील. त्यानंतर ते मुंबईतील न्हावा शेवा बंदरात एका कंटेनर टर्मिनलचे व्हर्च्युअल उद्घाटन करणार आहेत. पोर्ट ऑफ सिंगापूर अथॉरिटी इंटरनॅशनलने या प्रकल्पात १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. दोन्ही नेते त्यांच्या चर्चेदरम्यान आर्थिक सहकार्य, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटलायझेशन, शाश्वतता, कनेक्टिव्हिटी, आरोग्यसेवा आणि औषध आणि संरक्षण आणि सुरक्षा या आठ विशिष्ट क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी एक रोडमॅप निश्चित करतील अशी अपेक्षा आहे. तसेच दोन्ही बाजू नागरी अणुऊर्जा क्षेत्रात लहान मॉड्यूलर अणुभट्ट्यांच्या संयुक्त विकासावर देखील चर्चा करण्याची शक्यता आहे. सिंगापूर हा भारतातील गुंतवणुकीचा एक प्रमुख स्रोत आहे, २०१४ पासून त्यांची एकत्रित गुंतवणूक १७५ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचली आहे. त्यामध्ये कोविडनंतरच्या काळात ६० अब्ज अमेरिकन डॉलरच्या गुंतवणुकीचा समावेश आहे. भारत-सिंगापूर राजनैतिक संबंधांच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त वोंग यांचा भारत दौरा होतो आहे. सिंगापूरचे पंतप्रधान वोंग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इतर अनेक केंद्रीय मंत्री पंतप्रधान वोंग यांची भेट घेणार आहेत. मंगळवारी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि त्यांच्या पत्नी लू त्झे लुई यांनी राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले.