पंतप्रधान करणार आज वर्षातील शेवटची ‘मन की बात’

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज देखील ते देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, आज पंतप्रधान या वर्षातील शेवटची मन कि बात करणार आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह कोरोना लस आणि गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदी आज बोलण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 29 नोव्हेंबरच्या मन की बातमध्ये बोलताना कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे म्हटले होते.त्यांनी म्हटले होते की, गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, त्या पूर्ण झाल्या आहेत. सविस्तर चर्चा आणि विचारमंथनातून संसदेने कृषी विधेयकांना मंजुरी देत त्याचे कायद्यात रुपांतर केले. या नव्या सुधारणांमुळे शेतकऱ्यांना नवे अधिकार देखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले होते.
कोरोना महामारीने प्रभावित झालेल्या या वर्षीच्या बाबतीत आपला दृष्टीकोन काय आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना विचारलं होतं. त्याचबरोबर येणाऱ्या नव्या वर्षामध्ये लोकांची सरकारकडून काय अपेक्षा आहे याच्याबद्दल मतही मागवले आहे. एका ट्वीटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना अशी विचारणा केली होती.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, “सरत्या वर्षाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून पाहता आणि येत्या नव्या वर्षात तुमच्या काय अपेक्षा आहेत.” या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी लोकांचे विचार मागवले होते. याबाबत लोकांनी आपला संदेश ‘MyGov’ आणि ‘नमो अॅप’ वर पाठवावा, तसेच 1800-11-7800 या नंबरवरही व्हॉइस मेसेज करावा असे आवाहन नरेंद्र मोदींनी केले होते.
27 सप्टेंबरच्या मन की बात मध्ये शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेवर भाष्य केलं होतं. देशाचे कृषी क्षेत्र, आमचे शेतकरी, हे आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. मागच्या काही काळात या क्षेत्राने अनेक बंधनातून स्वतःला मुक्त केले आहे, मला अनेक शेतकऱ्यांची पत्रे मिळत राहतात, या क्षेत्रात कशा प्रकारे बदल होत आहेत याबद्दल ते मला माहिती देत राहतात, असे मोदी म्हणाले होते.





