PM-SYM Scheme: असंघटित कामगारांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन; पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे जाणून घ्या…
PM-SYM Scheme: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारची PM-SYM योजना. 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी पात्रता, मासिक हप्ता, अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

PM-SYM Scheme: देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कामगारांकडे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. अशा कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयांची हमी पेन्शन दिली जाते.
रस्त्यावरील विक्रेते, मजूर, घरगुती कामगार, हातमजुरी करणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच या कामगारांनाही निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी, हा या योजनेचा उद्देश आहे.
PM-SYM योजनेचा फायदा काय? (PM-SYM Scheme)
या योजनेत सहभागी झालेल्या कामगारांनी कामाच्या काळात दरमहा ठराविक रक्कम भरायची असते. त्यानंतर 60 वर्षे पूर्ण झाल्यावर सरकारकडून दरमहा 3,000 रुपयांची निश्चित पेन्शन दिली जाते. त्यामुळे वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचा आधार मिळतो.
कोण अर्ज करू शकतो? (PM-SYM Scheme)
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेसाठी खालील अटी लागू आहेत. अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे., मासिक उत्पन्न 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे. अर्जदार EPF, ESIC किंवा NPS या योजनांचा सदस्य नसावा.
वयानुसार मासिक हप्ता – (PM-SYM Scheme)
या योजनेत भरावयाचा मासिक हप्ता अर्जदाराच्या वयानुसार ठरतो. 18 वर्षे वय असल्यास दरमहा 55 रुपये भरावे लागतात. 40 वर्षे वय असल्यास दरमहा 200 रुपये भरावे लागतात.
विशेष म्हणजे, लाभार्थी जितकी रक्कम भरतो तितकीच रक्कम केंद्र सरकारही त्याच्या खात्यात जमा करते. त्यामुळे योजनेचा आर्थिक भार कमी होतो आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवणे अधिक सोपे होते.
अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी इच्छुक कामगार आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन नोंदणी करू शकतात. देशभरात सुमारे 4 लाख CSC केंद्रे उपलब्ध आहेत. तसेच PM-SYM च्या अधिकृत संकेतस्थळावरूनही ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बचत बँक खात्याची पासबुक, बँक खात्यातून हप्ता वळता करण्यासाठी (Auto Debit) संमतीपत्र.





