पी.एम. शहा फाऊंडेशन कडून १० शाळांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता सप्ताहानिमित्त स्वच्छता जनजागृती फेरीचे आयोजन

महात्मा गांधींचे स्वच्छता विषयीचे कार्य आणि विचार तरुणाईमध्ये स्वच्छ व सुंदर भारत निर्मितीसाठी चैतन्य निर्माण करणारे आहेत. परंतु मोबाईलच्या विश्वात हरविलेल्या तरुणाईस जागृत करणे गरजेचे आहे. पी. एम. शहा फाऊंडेशन “स्वच्छता, स्वच्छतागृहे व पिण्याचे सुरक्षित पाणी” या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे विचार कृतीत उतरविण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. असे उद्गार हुजूरपागा मुलींची प्रशाला लक्ष्मी रोडच्या मुख्याध्यापिका केतकी पेंढारकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वच्छता सप्ताहानिमित्त हुजूरपागा मुलींचे प्रशाला लक्ष्मी रोड येथे पी.एम. शहा फाऊंडेशन आणि हुजूरपागा प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने परिसर स्वच्छता व स्वच्छता जागृती फेरीचे आयोजन केले होते, याप्रसंगी त्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करीत होत्या.
पी. एम. शहा फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकीतून वर्षभर पुणे शहरातील 10 निवडक शाळांमध्ये स्वच्छता जागृती करीत आली आहे, असे मत पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक ॲड. चेतन गांधी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अरुण फडतरे, पर्यवेक्षिका साधना घोडके, रेखा रायसोनी, रूपाली चव्हाण, रवींद्र कावरे, संध्या पंचमुख व ललिता पानस्कर यांनी केले.





