पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट असलेला “पीएम नरेंद्र मोदी’ 24 मे रोजी रिलीज होणार आहे. या जीवनपटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणाऱ्या विवेक ओबेरॉयने स्वतः नागपूरात ही माहिती दिली आहे. याबरोबर या सिनेमाचा दुसरा ट्रेलर देखील आता रिलीज करण्यात आला आहे. या नवीन ट्रेलर मधून कॉंग्रेस पार्टी, पूर्वीचे “युपीए’ सरकार आणि त्या सरकारचे नेतृत्व करणारे डॉ. मनमोहन सिंग यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे.
या नवीन ट्रेलरच्या सुरुवातीलाच “मोदी मोदी’ अशा घोषणा ऐकायला येतात. त्यानंतर सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांची पात्रे दिसायला लागतात. “पीएम नरेंद्र मोदी’ यापूर्वीच म्हणजे 11 एप्रिलला रिलीज केला जाणार होता. मात्र निवडणूक आयोगाने आचार संहितेचे कारण सांगून या सिनेमाच्या रिलीजवर बंदी घातली होती. सरतेशेवटी हा सिनेमा निवडणूकीचा निकाल 23 मे रोजी लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 मे रोजी रिलीज करण्याचे ठरले आहे. बोमन इराणी, झरीना वहाब, मनोज जोशी हे या सिनेमातील अन्य प्रमुख कलाकार आहेत.