पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा ; संघ अन् भाजपच्या संबंधांसाठी किती महत्त्वाचा? ; वाचा सविस्तर

PM Modi’s Nagpur visit । राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये दोन दिवसापूर्वी दंगल उसळली आहे. त्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या जमावाने जाळपोळ आणि दगडफेक करून शहरात दहशत निर्माण केल्याची घटना घडली. यामध्ये गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे तर दगलखोरांकडून पोलिसांवर हत्यारं आणि दगडाने मारहाण करण्यात आली आहे. आता देखील शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता या अशा वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी नागपूरला भेट देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यावर अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहेत .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा पूर्वनियोजित असला तरीअशा वेळी होत आहे जेव्हा संघ आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे वाटत नाही. तसेच पुढील महिन्यात भाजपचा नवीन अध्यक्ष देखील निवडला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
संघाचे विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डा यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी पक्ष निवडणुका जिंकण्यास पूर्णपणे सक्षम आहे, म्हणजेच संघाच्या मदतीची आवश्यकता नाही असे विधान केल्यानंतर संघ आणि भाजपमधील संघर्ष निर्माण झाला. पण लोकसभा निवडणुकीचे निकाल येताच नड्डा यांचा दावा पूर्णपणे पोकळ ठरला, कारण यावेळी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते.
दरम्यान, निवडणुकीच्या माध्यमातून संघाकडून भाजपला फक्त धडा शिकवायचा होता असेच दिसले. कारण विधानसभा निवडणुका लक्षात घेता, संघ नेतृत्व पुन्हा कार्यकर्त्यांसह मैदानात उतरले. त्याचाच परिणाम म्हणून निकालही चांगले आले. सर्वात खास होते दिल्ली निवडणुकीचे निकाल. आज दिल्लीत भाजपचे सरकार आहे आणि एमसीडीमध्येही सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मोदींचा नागपूरला पहिलाच दौरा PM Modi’s Nagpur visit ।
ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपुरात कार्यक्रम आहे, त्या दिवशी गुढीपाडवा आहे. म्हणजेच मराठी नववर्षाचा पहिला दिवस. सर्वप्रथम, पंतप्रधान मोदी त्याठिकाणी माधव नेत्र रुग्णालयाची पायाभरणी करणार आहेत, परंतु राजकीय महत्त्व तर मोहन भागवतांसह संघ नेत्यांसोबतची बंद दाराआड बैठकीला आहे. मोदी आणि भागवत यांच्याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे देखील कार्यक्रमांमध्ये व्यासपीठावर उपस्थित राहतील असे सांगितले जाते.
२०१४ नंतर पंतप्रधान मोदी आणि संघप्रमुख भागवत यांच्यातील ही तिसरी जाहीर सभा असेल आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच सभा असणार आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींची आरएसएस मुख्यालयाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. याआधीच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नागपूर भेटीबद्दल बरीच चर्चा झाली होती.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाला भेट देणार आहेत. मुख्य प्रवाहातील राजकारणात येण्यापूर्वी ते संघात काम करत होते. मोदी आणि भागवत यांच्यात अशीच एक बैठक एप्रिल २०२३ मध्ये होणार होती, परंतु कर्नाटक विधानसभा निवडणुकीमुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द करण्यात आला. अलिकडेच, एका पॉडकास्टमध्ये, संघाबद्दल विचारले असता, मोदी म्हणाले, “हे माझे भाग्य आहे की मला अशा पवित्र संघटनेकडून जीवनमूल्ये मिळाली.”
मोदींचा संघाशी थेट संवाद PM Modi’s Nagpur visit ।
संघ मुख्यालयात पोहोचल्यावर, स्वागत स्मारक समितीच्या वतीने माजी सरचिटणीस भैयाजी जोशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतील. असे म्हटले जाते की, नागपूरमध्ये मोदी आणि भागवत यांच्यात एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा भाजपला लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे. आणि सर्वांना हे देखील माहित आहे की संघाचा हिरवा कंदीलशिवाय कोणीही भाजप अध्यक्ष होऊ शकत नाही.
संघाच्या प्रतिनिधी सभेची बैठक मोदींच्या नागपूर भेटीपूर्वीच पार पडणार आहे. ही बैठक २१-२३ मार्च रोजी होणार आहे. या वर्षी संघ त्याच्या स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करत आहे. आणि, त्याच बैठकीत, संघाच्या शताब्दी वर्षाच्या कृती आराखड्यावर विशेष चर्चा होणार आहे. कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे . संघ मुख्यालयाच्या बैठकीत भाजप अध्यक्षांच्या नावाव्यतिरिक्त लोकसंख्या धोरण आणि धर्मांतर यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोदी-भागवत भेटीचे महत्त्व
लोकसभा निवडणुकीनंतर देशात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये संघाचे नेतृत्व आणि कार्यकर्ते पूर्वीइतकेच सक्रिय असल्याचे दिसून आले. काहीही असो, जम्मू आणि काश्मीरमध्ये फारशी शक्यता नव्हती आणि झारखंडमध्ये गोष्टी यशस्वी झाल्या नाहीत, परंतु हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जवळ येताच संघाच्या प्रयत्नांनी वाऱ्याची दिशा बदलली. पण भाजप नेतृत्वही असेच मानते का? की, भाजपची भूमिका अजूनही लोकसभा निवडणुकीपूर्वी जेपी नड्डा यांच्याकडून ऐकल्यासारखीच आहे? हा एक सवालच असल्याचे दिसून येत आहे.
नड्डा यांच्या वतव्याने संघ आणि भाजपमध्ये तणाव
मे २०२४ च्या सुमारासएका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत,नड्डा यांनी,” वाजपेयी-अडवाणींच्या काळात भाजप आणि संघ यांच्यातील संबंधांशी संबंधित एका प्रश्नाच्या उत्तरात महत्वपूर्ण विधान केले होते. “सुरुवातीला आपण कमकुवत होतो… आपल्याला संघाची गरज होती… आज आपण मोठे झालो आहोत, आणि आपण सक्षम आहोत, म्हणून भाजप स्वतःहून चालते… संघाची पक्षाला गरज नाही हाच फरक आहे.”असे विधान केले होते . त्यांच्या या विधानाने भाजप आणि संघ यांच्यात एक प्रकारचा तणाव निर्माण झाला होता.
मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन दोघांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आत आहे. राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार आहेत. त्याच निवडणूका संघाच्या मदतीने योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. दिल्ली , हरियाणा आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भाजपला यश मिळाले आहे तसेच निर्विवाद यश मिळाले त्याच पद्धतीने आगामी बिहार आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्यचा निवडणुकांचा निकाल भाजपच्या बाजूने लागण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत म्हटले आहे.





