Pahalgam Attack : पंतप्रधान मोदींच्या बैठकांचा धडाका कायम; संरक्षण सचिवांनी घेतली भेट

नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाच्या बैठकांचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांची सोमवारी संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह यांनी भेट घेतली.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वी पर्यटकांना लक्ष्य करणारा भयंकर हल्ला घडवला. त्या हल्ल्यामागील पाकिस्तानी लागेबांधे दडून राहिले नाहीत. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
त्यातून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ठोस कारवाईची एकमुखी मागणी केली जात आहे. स्वत: मोदींनी दहशतवादाला जबर तडाखा देण्याचे सूतोवाच केले आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक अशा बैठकांचे सत्र सुरू ठेवल्याने मोठी कारवाई होण्याचे स्पष्ट संकेतही मिळत आहेत.
मागील आठवड्यात मोदींनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यावेळी संरक्षण दलांचे प्रमुखही उपस्थित होते. संबंधित बैठकीत मोदींनी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संरक्षण दलांना पूर्ण मोकळीक दिली. त्यानंतरही मोदींनी काही महत्वाच्या भेटी घेतल्या.
मागील दोन दिवसांत त्यांनी नौदलप्रमुख दिनेश के.त्रिपाठी आणि हवाई दलप्रमुख ए.पी.सिंग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. त्यापाठोपाठ संरक्षण सचिवांनी मोदींची भेट घेतल्याची घडामोड घडली.





