इंफाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा निश्चित झाला आहे. ते शनिवारी (१३ सप्टेंबर) मणिपूरमध्ये ८ हजार ५०० कोटी रूपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. मणिपूरमध्ये मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाने डोके वर काढले. त्यातून त्या राज्यात प्रदीर्घ काळ हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे मणिपूरमध्ये अशांत स्थिती निर्माण झाली. ती स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी, जनतेला दिलासा देण्यासाठी मोदींनी मणिपूरचा दौरा करावा, अशी मागणी विरोधक सातत्याने करत होते. मागील काही दिवसांपासून मोदी मणिपूरला जाणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र, त्यांच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. अखेर गुरूवारी मणिपूरमधील अधिकाऱ्यांनी मोदींच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती दिली. त्यातून वांशिक संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर मोदी प्रथमच मणिपूरचा दौरा करणार असल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले. मोदींच्या हस्ते इंफाळ आणि चुराचांदपूरमध्ये विविध प्रकल्पांचा प्रारंभ होईल. मोदींच्या दौऱ्यामुळे इंफाळ, चुराचांदपूरमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने केंद्रीय आणि राज्याच्या सुरक्षा दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत.