Narendra Modi : ‘देशाच्या शत्रूंना ओळखा, पराभूत करा’; रावण दहनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे आवाहन
Narendra Modi : विजयादशमीनिमित्त दिल्लीतील रावण दहन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींना पराभूत करण्याचे आवाहन केले. रामराज्य, विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारतावरही त्यांनी भाष्य केले.

Narendra Modi : समाजात फूट पाडणाऱ्या आणि देशाच्या संस्कृतीचा द्वेष करणाऱ्याची मानसिकता असलेल्या शक्तींना ओळखून पराभूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विजयादशमीच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील आयपी एक्स्टेंशन येथे आयोजित रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रभू रामांच्या जीवनातून मोठी शिकवण मिळते. संकट कितीही मोठे असले किंवा आव्हान कितीही कठीण असले, तरी इतरांच्या मदतीची वाट पाहत बसू नये. स्वतःची ताकद, साधने आणि संकल्पावर विश्वास ठेवून प्रयत्न करायला हवेत.
रामराज्याचा उल्लेख करताना मोदी यांनी ते सुशासनाचे उदाहरण असल्याचे सांगितले. रामराज्यात कोणाशीही भेदभाव होत नाही, सर्वांना न्याय आणि समान संधी मिळते. सत्तेचा उद्देश केवळ शासन करणे नसून जनकल्याण असतो, असे त्यांनी सांगितले.
तसेच गरीब आणि वंचितांच्या सेवेला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. देशासमोर विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट असल्याचे सांगत, जनशक्तीच्या माध्यमातून जनकल्याण साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
‘मां भारतीच्या शत्रूंना ओळखून त्यांचा पराभव करावा आणि राष्ट्र प्रथम या भावनेने सर्वांनी एकत्र यावे,’ असे आवाहनही केले. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी घेतलेला ‘राम से राष्ट्र आणि देव से देश’ हा संकल्प पूर्ण करण्याचा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.





