Bihar Election 2025 : बिहारमध्ये पंतप्रधान मोदी वाढवणार प्रचाराची रंगत; २४ ऑक्टोबरपासून प्रारंभ

Bihar Election 2025 – विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या बिहारमध्ये लवकरच प्रचाराची जोरदार धुमाळी सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभागामुळे त्या प्रचाराची रंगत आणखीच वाढेल. मोदी २४ ऑक्टोबरपासून सत्ताधारी एनडीएच्या आणि विशेषत: भाजपच्या प्रचार मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत.
बिहारमधील यावेळची निवडणूक अतिशय अटीतटीची ठरण्याची चिन्हे आहेत. सत्ता राखण्याचा निर्धार केलेल्या एनडीएने झंझावाती प्रचाराची आखणी केली आहे. त्यातून मोदींचा प्रचार कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्याविषयीची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
समस्तीपूरमध्ये येत्या शुक्रवारी होणाऱ्या सभेच्या माध्यमातून मोदी प्रचाराचा नारळ फोडतील. त्याच दिवशी त्यांची बेगुसरायमध्ये आणखी एक सभा होईल. त्यानंतर ३० ऑक्टोबरला मुझफ्फरपूर आणि छपरामध्ये मोदींच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे चालू महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांच्या बिहारमध्ये ४ सभा होतील. त्यानंतर २, ३, ६ आणि ७ नोव्हेंबरला मोदी प्रचारासाठी बिहारमध्ये असतील. त्या राज्यात २ टप्प्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल.





