पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये टीएमसी जाणार, भाजपची सत्ता येणार’; कोलकात्यात सभेला तुफान गर्दी

PM Modi On TMC: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यादरम्यान तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कोलकात्यात मेट्रोच्या तीन नव्या मार्गांचा शुभारंभ केल्यानंतर जनसभेत बोलताना त्यांनी टीएमसीवर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीला खतपाणी घालण्याचा आरोप केला. “बंगालमध्ये परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. बहीण-मुलींवर अत्याचार, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार वाढला आहे. जोपर्यंत टीएमसी सत्तेत आहे, तोपर्यंत बंगालचा विकास खुंटलेलाच राहील,” असे मोदी म्हणाले.
केंद्राचा निधी लुटला जातो
पंतप्रधानांनी सांगितले की, केंद्र सरकार बंगालच्या विकासासाठी भरघोस निधी पाठवते, परंतु त्यातील बहुतांश हिस्सा टीएमसी कार्यकर्त्यांवर खर्च होतो. “केंद्राकडून पाठवलेला पैसा लुटला जातो. यामुळे गरीब कल्याणाच्या अनेक योजना बंगालमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडल्या आहेत,” असे त्यांनी ठणकावले. “जोपर्यंत टीएमसी सत्तेत आहे, तोपर्यंत खरा बदल अशक्य आहे. गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी यांना सत्तेत नव्हे, तर तुरुंगात असायला हवे,” असेही ते म्हणाले.
#WATCH | कोलकाता: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कोलकाता में एक जनसभा को संबोधित करते हुए कहा, “बंगाल में विकास कार्यों के सामने एक बहुत बड़ी चुनौती है, चुनौती ये है कि बंगाल के लिए जो पैसा हम सीधे राज्य सरकार को भेजते हैं, उसमें से ज़्यादातर हिस्सा लूट लिया जाता है… वो पैसा TMC… pic.twitter.com/5lYTT0fp82
— ANI_HindiNews (@AHindinews) August 22, 2025
बंगालच्या विकासासाठी केंद्राची साथ
मोदींनी नमूद केले की, पश्चिम बंगाल हे देशातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांपैकी एक आहे. “बंगालची प्रगती झाल्याशिवाय ‘विकसित भारत’चे स्वप्न पूर्ण होणार नाही. गेल्या ११ वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत,” असे त्यांनी सांगितले. कोलकात्यासारखी शहरे भारताच्या इतिहास आणि भविष्याची ओळख असल्याचे सांगत, त्यांनी मेट्रो विस्तारासारख्या प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले.
मेट्रो विस्तार आणि ५,२०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधानांनी बंगालला ५,२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची भेट दिली. यामध्ये मेट्रोच्या ग्रीन लाइन (सियालदह-एस्प्लानेड, २.४५ किमी, १,१८५ कोटी), यलो लाइन (नोआपाडा-जय हिंद विमानवंदर, ६.७७ किमी, २,१८६ कोटी) आणि ऑरेंज लाइन (बेलेघाटा-हेमंत मुखोपाध्याय, ४.३९ किमी, ८१५ कोटी) यांचा समावेश आहे. यामुळे कोलकाता विमानतळ मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून, प्रवासाचा वेळ १ तासावरून १० मिनिटांवर येणार आहे. याशिवाय, हावडा स्टेशनवर ४३ कोटींच्या नव्या सब-वेचे उद्घाटन आणि ६-लेन कोना एक्स्प्रेसवेचा (७ किमी, १,२०० कोटी) शिलान्यास करण्यात आला.
“बंगालला नव्या प्रकाशाची गरज”
पंतप्रधानांनी बंगालच्या जनतेला बदलाची गरज असल्याचे आवाहन केले. “काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या दीर्घ काळानंतर बंगालच्या जनतेने १५ वर्षांपूर्वी ‘मां, माटी, मानुष’च्या नाऱ्यावर विश्वास ठेवून टीएमसीला सत्ता दिली, पण परिस्थिती आणखी बिकट झाली. बंगालला आता खऱ्या परिवर्तनाची आणि नव्या प्रकाशाची गरज आहे,” असे ते म्हणाले. तसेच, घुसखोरीच्या वाढत्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
दुर्गापूजेच्या उत्साहात विकासाचा रंग
कोलकात्यात दुर्गापूजेची तयारी जोरात सुरू असताना पंतप्रधानांनी सांगितले, “आस्थेसोबत विकासाचा उत्सव जोडला गेला की आनंद दुप्पट होतो.” कोलकात्यातील मेट्रो विस्तारामुळे प्रवास सुलभ होईल आणि नागरिकांचे जीवनमान सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपचा संकल्प आणि सिद्धी
“भाजप जो संकल्प घेते, तो सिद्ध करून दाखवते,” असे सांगत पंतप्रधानांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा दाखला दिला. कोलकात्याच्या प्रगत विचारसरणीचे कौतुक करत त्यांनी घुसखोरीविरुद्ध जागरूकतेचे आवाहन केले. “जगातील विकसित देश आता घुसखोरांना सहन करू शकत नाहीत. बंगालनेही याबाबत जागरूक राहायला हवे,” असे ते म्हणाले. या दौऱ्याने पंतप्रधानांनी बंगालच्या विकासाला चालना देताना टीएमसी सरकारवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. तसेच तृणमूलची सत्ता जाणार भाजप येणार असे ते म्हणाले.





