पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ITPO संकुलात उद्घाटनापूर्वी केले होमहवन

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय राजधानीतील ITPO संकुलात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन-कम-कन्व्हेन्शन सेंटर संकुलाच्या उद्घाटनापूर्वी तेथे होमहवन आणि पूजा केली. प्रगती मैदानात हे संकुल उभारण्यात आले आहे. या संकुल उभारणीला 2700 कोटी रूपये खर्च आला आहे. ते आज मोदींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
देशात बैठका, परिषदा आणि प्रदर्शने आयोजित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे संकुल विकसित करण्यात आले आहे. एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रगती मैदानावरील जुन्या आणि कालबाह्य सुविधांमध्ये सुधारणा करणारा हा प्रकल्प सुमारे 2700 कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आला आहे.
अंदाजे 123 एकर परिसर असलेले, हे संकुल भारतातील सर्वात मोठे मीटिंग,प्रमोशनल कार्यक्रम, परिषदा आणि प्रदर्शनांसाठीचे संकुल आहे. नव्याने विकसित झालेल्या संकुलात कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन हॉल, ऍम्फी थिएटर इत्यादींसह अनेक अत्याधुनिक सुविधां उभारण्यात आल्या आहेत.
यात अनेक बैठक कक्ष, विश्रामगृहे, सभागृहे असून त्यात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजित करण्याची क्षमता आहे. यातील भव्य बहुउद्देशीय हॉल आणि प्लेनरी हॉलची एकत्रित क्षमता सात हजार लोकांची आहे, जी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध सिडनी ऑपेरा हाऊसच्या आसन क्षमतेपेक्षा मोठी आहे. ऍम्फीथिएटर 3,000 व्यक्तींच्या आसनक्षमतेने सुसज्ज आहे. या संकुलाची वास्तुशिल्प रचना भारतीय परंपरेवर आधारीत आहे.





