पंतप्रधान मोदी जपानच्या दौऱ्यावर; भारत आणि जपानमध्ये झाले ‘हे’ 13 करार

टोकियो : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांच्यात 15व्या भारत-जापान शिखर परिषदेत व्यापार, गुंतवणूक आणि नव्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही देशांनी पुढील दशकासाठी एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप तयार केला असून, यात चंद्रयान-5 मिशनसाठी इस्रो आणि जॅक्सा यांच्यातील सहकार्य आणि जपानकडून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचा संकल्प यांचा समावेश आहे.
मोदींचा ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’चा पुनरुच्चार
पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत आणि जपान हे दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जीवंत लोकशाही असलेले देश वैश्विक शांती आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचे भागीदार आहेत. “जपानी तंत्रज्ञान आणि भारतीय प्रतिभा यांचा संगम हा विजयी संयोजन आहे,” असे मोदी म्हणाले. त्यांनी ‘मेक इन इंडिया, मेक फॉर वर्ल्ड’चा नारा देत जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. याशिवाय, डिजिटल पार्टनरशिप 2.0, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सेमीकंडक्टर आणि रेअर अर्थ मिनरल्स यासारख्या क्षेत्रांत सहकार्याला प्राधान्य देण्याचे ठरले.
चंद्रयान-5 मध्ये सहकार्य, अंतराळातील नवे पर्व –
भारताच्या चंद्रयान-5 मोहिमेत जपानच्या जॅक्सा (Japan Aerospace Exploration Agency) सोबत सहकार्याचा करार झाला आहे. “हे सहकार्य पृथ्वीच्या सीमेपलीकडे जाऊन मानवतेच्या प्रगतीचे प्रतीक ठरेल,” असे मोदी म्हणाले. याशिवाय, हाय-स्पीड रेल्वे, बंदरे, विमानन आणि जहाजबांधणी यासारख्या क्षेत्रांत ‘नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप’ अंतर्गत प्रगती साधण्याचे उद्दिष्ट आहे.
10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचा संकल्प –
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, पुढील 10 वर्षांत जपानकडून भारतात 10 ट्रिलियन येन गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यात लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) तसेच स्टार्टअप्स यांना जोडण्यावर विशेष भर दिला जाईल. सेमीकंडक्टर, रेअर अर्थ मिनरल्स, क्लीन हायड्रोजन आणि अमोनिया यासारख्या क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यावरही भर देण्यात आला.
13 करारांवर स्वाक्षऱ्या
या शिखर परिषदेत दोन्ही देशांदरम्यान 13 महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यात भारत-जापान संयुक्त दृष्टिकोन, सुरक्षा सहकार्य, डिजिटल पार्टनरशिप 2.0, खनिज संसाधन, सांस्कृतिक आदान-प्रदान, पर्यावरण सहकार्य, आणि चंद्रयान-5 साठी इस्रो-जॅक्सा सहकार्य यांचा समावेश आहे. याशिवाय, सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्थान आणि जपानच्या परराष्ट्र मंत्रालयातही करार झाला.
जपानी पंतप्रधानांचा वाराणसीचा उल्लेख –
जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांनी 2019 मधील वाराणसी भेटीचा उल्लेख करताना सांगितले की, भारतीय इतिहास आणि संस्कृतीने ते प्रभावित झाले होते. त्यांनी भारत-जापान संबंधांना विशेष रणनीतिक आणि वैश्विक साझेदारी म्हणून संबोधले.
वैश्विक स्थैर्यासाठी भारत- जापान सहकार्य महत्त्वाचे –
पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, भारत आणि जपान यांच्यातील साझेदारी केवळ दोन्ही देशांसाठीच नव्हे, तर वैश्विक शांती आणि सुरक्षेसाठीही आवश्यक आहे. “मजबूत लोकशाही देश एक चांगली दुनिया घडवण्यासाठी स्वाभाविक भागीदार आहेत,” असे ते म्हणाले. या शिखर परिषदेने दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
भारत आणि जपान यांच्यात झालेले १३ करार खालीलप्रमाणे –
१. पुढील दशकासाठी भारत-जपान संयुक्त दृष्टिकोन.
२. सुरक्षा सहकार्यासाठी संयुक्त घोषणापत्र.
३. भारत-जपान यांच्यातील मानव संसाधनांच्या देवाणघेवाणीसाठी कृती योजना.
४. संयुक्त कर्ज व्यवस्थेसाठी सहकार्य करारपत्र.
५. भारत-जपान डिजिटल भागीदारी २.० साठी करारपत्र.
६. खनिज संसाधन क्षेत्रातील सहकार्यासाठी करारपत्र.
७. चांद्रयान-५ मोहिमेसाठी भारत आणि जपानी अंतराळ संस्थांमधील सहकार्य.
८. स्वच्छ हायड्रोजन आणि अमोनियासाठी संयुक्त हेतुपत्र.
९. सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी सहकार्य करारपत्र.
१०. विकेंद्रित घरगुती सांडपाणी व्यवस्थापनासाठी करारपत्र.
११. पर्यावरण सहकार्यासाठी करारपत्र.
१२. भारताच्या सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्थान आणि जपानच्या परराष्ट्र मंत्रालयामधील करारपत्र.
१३. भारत आणि जपानच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि शिक्षण, संस्कृती, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामधील संयुक्त हेतुपत्र.





